खुटबाव, ता.१२ : एकेरीवाडी ( ता.दौंड) येथील दीपक रामकृष्ण व दिलीप रामकृष्ण टुले या बंधूंनी ५० गुंठे टोमॅटोचे पीक घेतले आहे. तोडलेल्या पिकाला प्रतिकिलो १० रुपयांपासून ते ५० रुपयापर्यंत बाजारभाव मिळाला. या पिकातून टुले यांच्या कुटुंबीयांच्या घरी लक्ष्मी अवतरली आहे. आजपर्यंत झालेल्या तोड्यांमध्ये तब्बल १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
टुले यांनी आठ मे २०२५ रोजी ६००० रोपांची लागवड केली. प्रत्येक रोपाची किंमत एक रुपया ८० पैसे होती. रोपे चाकूर मांडवे (ता. संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर) येथून आणण्यात आली. गरजेनुसार पाण्याचे व्यवस्थापन करण्यात आले. ठिबकमधून खते व औषधे सोडण्यात आली. याशिवाय योग्य वेळी बुरशीनाशके व कीटकनाशके फवारण्यात आली. तार व सुतळीच्या साह्याने तीन बांधण्या करण्यात आल्या.तारेच्या साह्याने वेल बांधल्याने टोमॅटो पिकाचा मंडप तयार झाला.६२ दिवसानंतर फळधारणा पूर्ण झाल्याने हंगाम सुरू झाला. दररोज तोडलेला माल नारायणगाव (ता. जुन्नर) येथील बाजारपेठेमध्ये पाठवण्यात आला.
२००० क्रेट टोमॅटोला २० रुपये किलो, तर १००० क्रेट टोमॅटोला ४५ ते ५० रुपये बाजार भाव मिळाला. सध्या दर कमी झाला असला तरी सध्या प्रतिकिलो दहा रुपये बाजार भाव चालू आहे. विशेष म्हणजे टोमॅटोच्या झाडाला फळधारणा जास्त झाल्याने दररोज तोडा केला जायचा. मजूर व वाहतूक यांच्या सहकार्यामुळे तोडणीचे काम सुलभ व्हायचे. सध्या दर कमी असल्याने शिल्लक तोड्यातून दीड लाख उत्पन्न मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
टोमॅटो पिकाचे अंदाजपत्रक
एकूण उत्पन्न..........१२ लाख रुपये
एकूण खर्च....३ लाख रुपये
सरासरी नफा...९ लाख रुपये
अशी केली शेतीची मशागत
दोन नांगरट व कल्टीवेटर मारला
चार ट्रेलर शेणखत व कोंबडखत टाकले.
चार फूट अंतरावर बेड तयार केले.
ठिबक सिंचनचे पाइप अंथरले
मल्चिंग पेपर अंथरला.
स्वर्गीय वडील रामकृष्ण टुले यांनी २०१६ मध्ये गावामध्ये सर्वप्रथम टोमॅटोची शेती सुरू केली. दरवर्षी चांगला नफा मिळत गेला. आजतागायत मिळालेल्या उत्पन्नातून घर, शेत जमीन खरेदी, राहण्यासाठी जागा खरेदी, वाहने खरेदी केली आहेत. विशेष म्हणजे मिळालेल्या उत्पन्नातून धार्मिक व सामाजिक कामासाठी कुटुंबाच्या वतीने अनेकदा योगदान दिले आहे.
- दीपक टुले, टोमॅटो उत्पादक शेतकरी
02889
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.