खुटबाव, ता.१८ : पुणे जिल्ह्यामध्ये अनेक सहकारी साखर कारखान्यांनी प्रतिदिन गाळप क्षमता वाढवली आहे. आपल्या कारखान्याकडून सर्वाधिक गाळप व्हावे हा त्यामागचा उद्देश आहे. मात्र, गेले तीन हंगामातील आकडेवारी पाहता गाळप हंगाम हा कमी दिवसांचा होत असल्याचे चित्र आहे. एकेकाळी १४० ते १५० दिवस चालणारा गाळप हंगाम आता १०० दिवसांवर येऊन ठेपल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील १५ पैकी १० कारखान्यांचा गळीत हंगाम संपल्यात जमा आहे.
जिल्ह्यामध्ये यावर्षी ९ सहकारी व सहा खासगी कारखान्यांनी गाळप केले. प्रत्येक दिवशी सरासरी एक लाख २६ हजार टन गाळप करण्यात आले. विशेष म्हणजे दैनंदिन गाळप क्षमता वाढूनही कारखान्याचे एकूण गाळप प्रतिवर्षी कमी होत असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.
जिल्ह्यामध्ये अनेक कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढवली. यामध्ये बारामती ॲग्रो कारखाना (प्रतिदिन २० हजार टन), दौंड शुगर कारखाना (प्रतिदिन १७५०० टन), भीमा पाटस कारखाना (प्रतिदिन १० हजार रुपये टन), माळेगाव कारखाना (प्रतिदिन ९ हजार टन), श्रीनाथ म्हस्कोबा कारखाना (५००० टन), सोमेश्वर कारखाना (९ हजार टन)
यासारख्या कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता वाढली,परंतु उसाचे क्षेत्र मात्र तेवढेच राहिले. त्यामुळे दिवसेंदिवस गाळप हंगाम कमी दिवसाचा होत चालला आहे. दरवर्षी मार्च अखेर चालणारे अनेक कारखाने यावर्षी जानेवारी अखेरीस बंद झाल्याचे दिसत आहे. याचा सर्वाधिक फटका वाहतूकदार ट्रॅक्टर चालक व ऊस तोडणी मजुरांना झाल्याचे दिसत आहे. कारण वाहतूकदार यांना टोळीसाठी गुंतवलेले पैसे हंगाम कमी दिवसाचा झाल्याने त्या तुलनेत मिळत नसल्याचे दिसत आहे. तसेच ऊस तोडणी मजुरांना फक्त तीन महिन्यांसाठी स्थलांतर करावे लागत आहे. त्यामुळे त्याचा जास्त दिवस चालणारा रोजगार कमी दिवसावर येऊन ठेपला आहे.
सोमेश्वर व माळेगाव कारखान्याचा अपवाद
बारामती तालुक्यातील सोमेश्वर व माळेगाव कारखान्याचे गाळप १५ मार्चपर्यंत चालेल असा अंदाज आहे. या कारखान्यांनी पहिला हप्ता ३३०० रुपये काढल्याने या कारखान्याच्या परिसरातील उसाची पळवापळवी होत नाही. त्यामुळे हे दोन कारखाने अजून महिनाभर चालतील असा अंदाज आहे.
पूर्वी अतिरिक्त उसाचा प्रश्न असल्याने सर्व कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवली. दौंड शुगरने सन २०१७ मध्ये प्रतिदिन गाळप क्षमता ७००० असूनही १२ लाख टन गाळप केले होते. गाळप क्षमता अडीच पटीने वाढून देखील त्या तुलनेत गाळप वाढत नाही. चालू वर्षी खोडव्यांना कमी एवरेज मिळाल्याचाही हंगामावर परिणाम झाला.
- वीरधवल जगदाळे, ज्येष्ठ संचालक दौंड शुगर
दौंड शुगर कारखाना गेले तीन हंगामातील आकडेवारी
सन. एकूण गाळप टनांत.................हंगाम दिवस
२०२३-२४...........१८ लाख ...........१२०
२०२४-२५...........१५ लाख ९१०००...........११०
२०२५-२६...........१५ लाख १७०००...........१०० दिवस)