खुटबाव, ता. २१ : खोर (ता. दौंड) परिसरातील डोंबेवाडी येथील धनंजय डोंबे व तानाजी डोंबे या बंधूंनी उजाड माळरानावर सहा एकरमध्ये जैविक शेती साकारली. त्यांनी अहोरात्र कष्ट करत खडकाळ जमीन फोडून अंजिराच्या बागेचे नंदनवन फुलवले आहे. डोंबे यांनी जैविक बेसल डोस वापरत अंजीर पिकातून सोनं पिकवले. गेल्या चार महिन्यांमध्ये त्यांनी २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.
डोंबे बंधूंना बांधावरच अंजिराला प्रतिकिलो ९० ते १०० रुपये बाजारभाव मिळत आहेत. तयार झालेले अंजीर पुणे, औरंगाबाद, उदगीर व बिदर येथील बाजारपेठेमध्ये विकले जात आहे.
डोंबेवाडी येथे उंच डोंगराळ भागामध्ये डोंबे यांची शेतजमीन पिढ्यानपिढ्या पडीक होती. पाच वर्षांपूर्वी यंत्रांच्या साह्याने डोंबे यांनी शेतजमीन तयार केली. डोंगराळ जमीन लागवडी योग्य होण्यासाठी पाच लाख रुपये किमतीची काळी माती माळशिरस (ता. पुरंदर) येथून खरेदी केली. ही माती खडकाळ जमिनीमध्ये समांतर पसरण्यात आली. घराशेजारील शेतामध्ये पाच लाख लिटर क्षमतेचे शेततळे तयार केले. या शेततळ्यातील व जनाई शिरसाई योजनेचे पाणी जलवाहिनीच्या साह्याने अंजिराच्या शेतीतील जमिनीमध्ये असणाऱ्या विहिरीमध्ये सोडण्यात आले.
दरम्यान, शेतात डाळिंब, कांदा, मिरची, कलिंगड, खरबूज आदी पिके घेण्यासाठी डोंबे बंधू सोबत त्यांच्या पत्नी सोनाली धनंजय डोंबे व रेश्मा तानाजी डोंबे दिवसभरात काम करतात.
असे बहरले पीक
- शेतामध्ये टप्प्याटप्प्याने १५ फूट अंतरावर १००० अंजिराची लागवड
- ठिबकच्या साह्याने अंजीर पिकांना पाणी दिले.
- पिकासाठी शेणखत, गांडूळ खत व मेंढ्यांचे लेंडी खताचा वापर
- शेतामध्येच गोमूत्र व जैविक जिवाणू साह्याने जीवामृत तयार करून पिकाला घातले
- विहिरीतील पाणी विद्युत पंपाच्या साह्याने उपसून शेतजमिनीत खेळविले
दिवसाआड ४०० किलो अंजिराचे उत्पन्न
अंजिराच्या खट्टा बहारामध्ये (सप्टेंबर ते जानेवारी) २० लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. तर मीठा बहार (फेब्रुवारी ते जून) आता सुरू झाला असून या कालावधीतही सध्या दिवसाआड ४०० किलो अंजिराचे उत्पन्न निघत आहे.
एकेकाळी दुष्काळी गाव म्हणून जिल्हाभर खोर गाव प्रसिद्ध होते. जनाई शिरसाई व पुरंदर उपसाचे पाणी गावाला मिळाल्याने अनेक ठिकाणी आठमाही व बारमाही पिके घेतली जात आहेत. दहा वर्षांपूर्वी पडीक असणारी माझी शेती या पाण्यामुळे हिरवीगार झाली आहे.
- तानाजी डोंबे, शेतकरी
03332
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.