कुरकुंभ, ता. २१ : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुकादमवाडी (ता. दौंड) येथे शुक्रवारी (ता. २०) रात्री तरुणाचा धारदार शस्त्रांनी निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध दौंड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मन्या उर्फ महेश संजय भागवत (वय २९, रा. पाटस, ता. दौंड) हा शुक्रवारी रात्री महेश मारुती टुले, युवराज शिंदे व राज होले यांच्यासमवेत दुचाकीवरून पाटसकडे जात होता. मुकादमवाडी पुलावर आल्यानंतर आनंद माकर, विकी शितकल व संतोष शितकल यांनी पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकींना पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत चौघेही महामार्गावर कोसळले. यानंतर संशयित आरोपींनी महेश भागवत याच्यावर कोयता व इतर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या भागवत याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
याबाबत महेश मारुती टुले (रा. पाटस) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आनंद माकर, विकी शितकल, संतोष शितकल (रा. अंबिकानगर, पाटस, ता. दौंड) तसेच त्यांच्या अन्य दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक गोपाळ पवार तपास करीत आहेत.
सुडाची शक्यता
पाटस येथे ४ जुलै २०२१ रोजी शिवम संतोष शितकल व गणेश रमेश माकर या दोन युवकांचा तलवारीने वार करून व डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. त्या दुहेरी खून प्रकरणात मृत महेश संजय भागवत याच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. सुमारे साडेचार वर्षांनंतर सूडभावनेतून हा खून करण्यात आला असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.