लोणी देवकर, ता. ६ ः स्वामित्व योजनेअंतर्गत लोणी देवकर (त. इंदापूर) येथील प्रॉपर्टी कार्डमध्ये झालेल्या चुकीच्या नोंदीबाबत अनेकवेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याबाबत ‘सकाळ’ने ‘प्रॉपर्टी कार्डच्या दुरुस्तीचा विसर’ अशी बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत भूमी अभिलेख कार्यालयाने दुरुस्ती शिबिराचे आयोजन केले. यामुळे ग्रामस्थांनी ‘सकाळ’चे आभार व्यक्त केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या तीन वर्षांपासून आपल्या प्रॉपर्टी कार्डमधील चुकीच्या नोंदीबाबत शासन दरबारी हेलपाटे घालणाऱ्या ग्रामस्थांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात होते. याबाबत ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधिक्षक सुशील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शिबिर आयोजित करण्यात आले. यामध्ये तक्रारदारांकडून कागदपत्रे पुरावे घेत प्रॉपर्टी कार्ड तपासणीची कार्यवाही केली. तीन वर्षापासून उपेक्षित राहिलेला प्रॉपर्टी कार्ड दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागण्याविषयी सकारात्मक पावले उचलली गेल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
तक्रारदारांकडून पुरावे घेत पडताळणी केली आहे. पूर्वी २३७ अर्ज कार्यालयाकडे दाखल झाले त्यापैकी १५४ तक्रारदारांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. या शिबिरामध्ये १३४ जणांचे कागदपत्रे पडताळणी केली आहे. गावातील सर्व नागरिकांची एकाच वेळी प्रॉपर्टी कार्ड दुरुस्त्या कराव्या लागणार असल्यामुळे यासाठी थोडा कालावधी लागू शकतो. तरी सर्व प्रक्रिया पूर्ण करत तक्रारदारांच्या सर्व तक्रारीचे कायदेशीर मार्गाने निपटारा करण्यावर आमच्या कार्यालयाचा भर असेल. पुढील दोन महिन्यांमध्ये नागरिकांच्या प्रॉपर्टी कार्ड दुरुस्त्या करत विषय मार्गी लावला जाईल.
- सुशील पवार, उपअधीक्षक,भूमिअभिलेख कार्यालय, इंदापूर
या दुरुस्त्यांसाठी तीन वर्षापासून आमचा पाठपुरावा चालू आहे. या अगोदरही पडताळणी झालेली आहे. मात्र, पुढे कोणतीही कार्यवाही होत नाही. तरी यावेळेस भूमी अभिलेख कार्यालयाकडून आमच्या हक्काचे संरक्षण करत सर्व कायदेशीर नोंदी लवकरात लवकर पूर्ण कराव्यात एवढी अपेक्षा आहे. असे न झाल्यास भूमी अभिलेख कार्यालयाविरुद्ध ग्रामस्थांच्या वतीने आंदोलनाचा बडगा उभारणार आहे.
- सचिन विठ्ठल डोंगरे, ग्रामस्थ, लोणी देवकर