मंचर, ता. १६ : आंबेगाव तालुक्यात पिंपळगावतर्फे महाळुंगे, पारगावतर्फे खेड व पेठ येथे शुक्रवारी (ता. १६) दुपारी विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला. येथे रस्त्यावरून पाणी वाहत होते. ओढ्यानाल्यांना पूर आला आहे. अनेक तलाव पाण्याने तुडुंब भरले आहेत. पिंपळगावतर्फे महाळुंगे येथे अनेक घरात व पिकात पुराचे पाणी शिरले आहे. शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
सकाळपासून हवेत प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारी जोरदार पावसाला सुरुवात झाली. विजा कोसळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. लग्नानिमित्त अनेक कुटुंबात सत्यनारायणाच्या पूजेचे कार्यक्रम होते. पावसामुळे कुटुंबीय व नातेवाइकांची धावपळ झाली. रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने व ओढ्या-नाल्यांना पूर आल्याने काही वेळ जनजीवन व वाहतूक विस्कळित झाली होती. पावसाने उघडीप दिल्यानंतर सत्यनारायणाच्या पूजेचे व भोजनाचे कार्यक्रम सुरु झाले. अनेक ठिकाणी वीज वाहिन्या तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. वीज पुरवठा पूर्ववत सुरु होण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या धावपळ सुरु होती.
‘‘पिंपळगावतर्फे महाळुंगे येथून अवसरी खुर्द गावाकडे जाणारा (अमराई मार्गे) डांबरी रस्ता वाहून गेला आहे. शंभरहून अधिक शेतजमिनीत असलेल्या उभ्या पिकात व ३०हून अधिक घरांमध्ये पाणी शिरल्याने लहान मुले व वृद्धांचे अतोनात हाल झाले,’’ अशी माहिती युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर यांनी दिली. या भागातील नुकसानीचे पंचनामे महसूल खात्याने करावे, अशी मागणी त्यांनी तहसीलदार संजय नागटिळक यांच्याकडे केली आहे.
सातगाव पठार भागात दरवर्षी चार हजार एकरपेक्षा अधिक क्षेत्रात खरीप हंगामात बटाटा लागवड केली जाते. बटाटा लागवड व पूर्व शेतीच्या मशागतीसाठी हा पाऊस उपयुक्त आहे. तसेच, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची गरज आता भासणार नाही.
- रमेश सावंत पाटील, प्रगतशील शेतकरी, पारगावतर्फे खेड (ता. आंबेगाव)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.