मंचर, ता. ५ : सातगाव पठार (ता.आंबेगाव) येथे गेली दीड महिना दररोज पाऊस पडत आहे. त्यामुळे जमिनीत वापसा नसल्याने बटाटा वाण लागवडीची ९५ टक्के कामे ठप्प आहेत. उर्वरित बटाटा लागवडीसाठी ‘पावसा पावसा थांब रे’ अशी म्हणण्याची वेळ या भागातील शेतकऱ्यावर आली आहे.
बटाटा आगार म्हणून सातगाव पठार राज्यात प्रसिद्ध आहे. एकूण चार हजार ५०० एकर क्षेत्रामध्ये दरवर्षी खरीप हंगामात पेठ, कारेगाव, थुगाव, भावडी, कोल्हारवाडी, कुरवंडी येथील शेतकरी बटाटा लागवड करतात.२४ कोटी २४ लाख रुपयांचे बटाटा पिकासाठी कर्ज वाटप पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पेठ व सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पेठ यांनी केले आहे.
‘‘पाच टक्के म्हणजेच १८५ एकर क्षेत्रात बटाटा लागवड झाली आहे. लागवड केलेला बटाटा सडण्याची भीती असल्याने व पाऊस थांबत नसल्याने शेतकरी बटाटा लागवडीसाठी धजावत नाहीत.’’ असे पेठ येथील शेतकरी राम तोडकर यांनी सांगितले.
‘‘दरवर्षी सर्वसाधारणतः ता.२० जून नंतर या भागात बटाटा लागवड शेतकरी करतात. पण वरुण राजा सतत कोसळत असल्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. एफ सी.एक, एफ सी ११ या सुधारित जातीचा बटाटा वाण शेतकऱ्यांनी एक महिन्यापूर्वी खरेदी करून ठेवला आहे. हवामानाचा परिणाम होऊ नये म्हणून शेडमध्ये बटाटे पांगून ठेवले आहेत. शेतकरी चिंतेत आहे,’’ असे अशोक बाजारे यांनी सांगितले. बटाटा लागवडीसाठी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले आहे, सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाचे शाखा अधिकारी केशवकुमार सिंग सांगितले.
दरम्यान, पारगावतर्फे खेड येथे ७५० एकर क्षेत्रापैकी ५० टक्के बटाटा लागवड झाली आहे. उर्वरित बटाटा लागवडीसाठी पाऊस थांबला पाहिजे असे शेतकरी भाऊसाहेब सावंत पाटील यांनी सांगितले.
दोन हजार १०० शेतकऱ्यांना १६ कोटी २४ लाख रुपये कर्ज वाटप पुणे जिल्हा बँक व सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पेठ यांनी ५५० शेतकऱ्यांना बटाटा पिकासाठी ८ कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे.
- विष्णू गायकवाड, विभागीय अधिकारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मंचर
पावसामुळे जमिनीतून पाण्याचे प्रवाह सुरू झाले आहेत. बटाटा लावल्यानंतर पुन्हा पाऊस झाल्यास वाण सडण्याचा धोका आहे.
-बबन तोत्रे, शेतकरी, कुरवंडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.