मंचर, ता. १४ : आकाशचा वाढदिवस साजरा करायचा, केक कापायचा, मित्रांसोबत जल्लोष करायचा, अशी तयारी सुरू होती. पण वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या ऐवजी आकाश वर श्रद्धांजली वाहण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे.
अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील आकाश बाळासाहेब जाधव (वय २७) आणि मयूर संपत जाधव (वय २३) या दोन तरुणांचा मोटरसायकल खोल खड्ड्यात कोसळून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (ता. १३) रात्री उशिरा घडली. आकाशचा वाढदिवस मंगळवारी (ता. १४) होता. त्यानिमित्त घरात उत्साहाने तयारी सुरू होती. रात्री मित्रांसोबत केक कापण्याचे ठरवून तो व मयूर मंचर येथे आले. रात्री उशिरा केक घेऊन ते आपल्या अवसरी बुद्रुक गावाकडे मोटरसायकलवरून (क्र. एमएच १४ एमएन ७१६४) परत जात होते. अवसरी खुर्द हद्दीत सुरेश भोर यांच्या घराजवळ आले असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या तब्बल २० फूट खोल खड्ड्यात त्यांची मोटरसायकल कोसळली.
मोठा आवाज ऐकून सुरेश भोर, संदीप भोर, सरपंच वैभव वायाळ, अमोल वायाळ, अमित भोर व योगेश भोर हे मदतीसाठी धावून आले. त्यांनी दोर टाकून अर्धा तास प्रयत्न करून दोघांनाही बाहेर काढले. मात्र, त्यावेळी दोघांची हालचाल बंद होती. मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी दोघेही मृत असल्याचे घोषित केले.
घटनास्थळी सहाय्यक फौजदार गणेश डावखर, पोलिस हवालदार लखन माने व एस. डी. ढोबळे यांनी पंचनामा केला. या दुर्घटनेनंतर माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक विष्णू हिंगे यांनी रुग्णालयात भेट देऊन नातेवाईकांचे सांत्वन केले.
मंगळवारी सकाळी दोघांचे शवविच्छेदन करून गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.
खड्डा जीवघेणा ठरला
अवसरी फाटा ते अवसरी खुर्द या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे खात्याच्या सीमेवर तब्बल २० फूट खोल व ७ ते ८ फूट रुंद असा खड्डा तयार झाला आहे. आजू बाजूला झाडी आहे. या खड्ड्यात सांडपाणी साचलेले असून, रात्री प्रकाशाच्या अभावामुळे तो दिसत नाही. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, जर या ठिकाणी संरक्षक कठडा असता, तर दोन तरुणांचे प्राण वाचले असते. ग्रामस्थांनी हा खड्डा तातडीने बुजविण्याची मागणी केली आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षात चार जणांचा मृत्यू या खड्ड्यात झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. हा खड्डा बुजवावा व या ठिकाणी गतिरोधक बसवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
14347, 14348, 14349
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.