मंचर, ता.१० : मे महिन्यापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबेगाव, खेड, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गेल्या आठ दिवसांपासून पाऊस उघडला असला तरी रब्बी हंगामातील पिकांसाठी अत्यावश्यक असलेले युरिया खताची टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी मात्र अडचणीत आले आहेत.
आंबेगाव तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात तीन हजार टन युरियाची मागणी असताना प्रत्यक्षात फक्त ३७५ टन खत उपलब्ध झाले. भाजीपाला, मका, ऊस, कांदा, बटाटा या पिकांच्या वाढीच्या निर्णायक टप्प्यात नायट्रोजनचा तुटवडा भासू लागल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे, अशीच परिस्थिती जुन्नर, शिरूर व खेड तालुक्यात आहे.
आंबेगाव तालुक्यात २४५ खतविक्रेते व खरेदी विक्री संघाची सात विक्री केंद्रे आहेत. तर आवक घट, वाहतुकीतील विलंब, पुरवठा साखळीतील अडथळे तसेच कंपन्यांना आगाऊ रक्कमा देऊनही खतांचा पुरवठा होत नसल्यामुळे दुकानदारही चिंतेत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या भडीमाराला त्यांना सामोरे जावे लागते.
शिष्टमंडळाची भेट...
खत उपलब्धतेच्या मागणीसाठी शेतकरी व खत विक्रेत्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी (ता.१०) माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मंचर येथे भेट घेतली. त्यांनी तत्काळ जिल्हा कृषी अधीक्षक संजय काचोळे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून शेतकऱ्यांना तातडीने खते उपलब्ध करून देण्यास सांगितले.
पुरवठा बंद पडल्याने अडथळे
कल्लोड (गुजरात) येथून फुरसुंगी रेल्वे मालधक्क्यावर युरिया उतरवून आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर व मावळ तालुक्यांना पुरवठा केला जातो.
मात्र गेल्या तीन महिन्यांपासून फुरसुंगी येथे रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे मालधक्का बंद आहे. त्यामुळे युरिया थेट बारामती मालधक्क्यावर उतरवला जातो. बारामतीचे अंतर जास्त असल्याने वाहतूक भाड्यात वाढ झाली असून त्याचा परिणाम आंबेगाव,खेड,जुन्नर,शिरूर व मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खर्चावर होत आहे. वाढीव दरांवरून काही भागांत शेतकरी–विक्रेते वादही होत असल्याचे पहावयास मिळते.
युरिया पिकांना सहज आणि जलद नायट्रोजन उपलब्ध करून देतो. पिकांची पाने गर्द हिरवी व तंदुरुस्त होतात, वाढ आणि जोम सुधारतो. फुलोरा व फळधारणा वाढते. उत्पादनात थेट वाढ होऊन शेतकऱ्यांचा नफा वाढतो. युरिया खत उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांच्या फायद्यात वाढ होईल.
- महेश मोरे, अध्यक्ष, पुणे जिल्हा ॲग्रो डीलर असोसिएशन
युरिया खताची सध्याची स्थिती
महिना मागणी पुरवठा
ऑगस्ट ३ हजार टन ७३६टन
सप्टेंबर ३ हजार टन ९८८ टन
ऑक्टोंबर ३ हजार टन ३७५टन
14531
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.