मंचर, ता. २९ : चिंचोली कोकण्याची (ता. आंबेगाव) येथील कचरू सहादू रोकडे (वय ६६) यांच्या मृत्यूस वैद्यकीय निष्काळजीपणा कारणीभूत ठरल्याचा आरोप करत सुशिल कचरू रोकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंचर पोलिस ठाण्यात ८ डॉक्टरांसह ५ रुग्णालय कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाबाबत गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती मंचर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी दिली.
या प्रकरणाचा तपास करणारे मंचर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश डावखर यांनी सांगितले की, सुशिल रोकडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १ जुलै २०१७ ते १६ जुलै २०१७ या कालावधीत घोडेगाव, मंचर व यशवंतराव चव्हाण रुग्णालय पिंपरी येथे त्यांचे वडील कचरू रोकडे यांच्यावर उपचार सुरू होते. या कालावधीत संबंधित डॉक्टर व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी उपचारात निष्काळजीपणा व हयगयी दाखविल्याचा आरोप करण्यात आला आहे. उपचारादरम्यान कचरू रोकडे यांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी डॉ. अतुल शिंदे, डॉ. रोहीत आवटे, डॉ. अमोल वाकचौरे, डॉ. सोनू यादव, सचिन खरात, जयसिंग काळे (सिद्धी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मंचर), डॉ. ओंकार काजळे (संजीवनी ॲण्ड चेस्ट जनरल हॉस्पिटल, राजगुरूनगर), डॉ. सुधीर तेजाळे (समतानगर, नाशिक), डॉ. गिता कुलकर्णी (ग्रामीण रूग्णालय घोडेगाव), डॉ. राजनीश पोतनीस (पोतनीस हॉस्पिटल, घोडेगाव), मारुती माने (यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल पिंपरी), रमेश शेवाळे (मेडीकल व्यावसायिक, मंचर), निर्मला गव्हाणे (अवसरी, ता. आंबेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने सुशील रोकडे यांनी न्यायालयात दाद मागितली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी घोडेगाव (ता. आंबेगाव) यांनी याबाबत मंचर पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश गुरुवारी (ता. २७) दिले.
वैद्यकीय अहवाल, उपचार नोंद, रुग्णालयांची फाईल, मृतदेह तपासणी अहवाल, तज्ज्ञांचे मत आदींचा सखोल अभ्यास करून पुढील तपास केला जाईल.
- गणेश डावखर, सहाय्यक उपपोलिस निरीक्षक, मंचर पोलिस ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.