मंचर, ता.२९ : विधानसभा निवडणुकांप्रमाणे घरपोच मतदानाची सुविधा नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांसाठी उपलब्ध न केल्याने उत्तर पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या सुविधेअभावी मंचर, जुन्नर, राजगुरुनगर, चाकण आणि श्रीक्षेत्र आळंदी या क्षेत्रांमध्ये ५०० पेक्षा अधिक ज्येष्ठ-दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आंबेगाव तालुका दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष समीर टाव्हरे यांनी सांगितले की, “अनेक ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदार विविध आजारांनी ग्रस्त असल्याने किंवा अंथरुणाला खिळलेले असल्याने मतदान केंद्रावर येऊ शकत नाहीत. विधानसभा निवडणुकीत निवडणूक विभागाचे पथक त्यांच्या घरी जाऊन मतदानाचा अधिकार मिळवून देत होते. मात्र, मंगळवारी (ता. २ डिसेंबर) होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ही सुविधा पूर्णतः गायब आहे.” यामुळे प्रत्यक्ष मतदानाची टक्केवारी घटण्याची भीती व्यक्त होत असून, मतदानातील समान संधी व सुलभतेचे तत्त्व धोक्यात येत असल्याची भावना दिव्यांग बांधव व्यक्त करत आहेत. स्थानिक पातळीवर ही तक्रार निवडणूक आयोगापर्यंत पोहोचविण्याची तयारीही संघटनांकडून सुरू आहे.
दिव्यांग व ज्येष्ठ ८५ वयाच्या पुढील व्यक्तीसाठी गृहमतदानाची सुविधा केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत देण्याची सूचना होती. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक करिता अशा प्रकारची सुविधा देण्याबाबत निर्देश नाहीत. पण मंचर येथे मतदान केंद्रावर संबंधित मतदार आल्यास त्यांच्यासाठी व्हीलचेअर उपलब्ध आहेत. त्यांना रांगेत उभे न करता ताबडतोब मतदानाचा हक्क बजावण्याची संधी दिली जाईल.
- अंजली कुलकर्णी, तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी मंचर नगरपंचायत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.