मंचर, ता. २० : मंचर (ता. आंबेगाव) नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी व निकाल रविवारी (ता. २१) क्रीडा संकुल येथे जाहीर होणार असून, त्यानिमित्ताने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने निकालानंतर कोणालाही मिरवणूक काढण्यास, डीजे वाजविण्यास अथवा गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मंचर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कांकाळ यांनी दिला.
कांकाळ म्हणाले की, रविवारी सकाळपासून मंचर शहर व परिसरात तसेच क्रीडा संकुल आवारात सुमारे १०० पोलीस कर्मचारी व ५ पोलीस अधिकारी तैनात राहणार असून, सतत गस्त घालण्यात येणार आहे. कोणत्याही ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे.
निवडणूक आचारसंहिता सोमवारपर्यंत (ता. २२) लागू असून, सर्व उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी तिचे काटेकोर पालन करावे. मिरवणुका काढणे, डीजेचा वापर, गुलाल उधळणे किंवा जमाव जमा करणे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. संबंधितांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. सर्व नागरिकांनी शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावे.