मंचर, ता. ३० : मंचर परिसरात नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच अपघात टाळता यावेत, यासाठी मंचर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. नागरिकांनी ३१ डिसेंबरचा दिवस शांततेत व आनंदात साजरा करावा, मात्र कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन मंचर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी केले आहे.
मंचर शहर परिसरातील नंदी चौक (तांबडेमळा), पिंपळगाव फाटा व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नाकेबंदी करण्यात येणार असून वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे. शहर व परिसरात चार पोलीस अधिकारी व ४० पोलीस कर्मचारी गस्त घालणार आहेत. दोन मोटरसायकलवरून चार पोलीस कर्मचारी, तसेच दोन पोलीस वाहनांद्वारे संशयास्पद वाहनांची सातत्याने तपासणी केली जाणार आहे. हा बंदोबस्त गुरुवार (ता. १ जानेवारी) सकाळपर्यंत कायम राहणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांनी दिली.
तसेच, मंचर व परिसरात सुमारे २५ शुद्ध शाकाहारी व २० मांसाहारी हॉटेल असून, अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन हॉटेल व्यावसायिकांनी आचारी व कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ केली आहे. तसेच, खवय्यांसाठी विविध आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत, असे हॉटेल व्यावसायिक अजय काटे, ऋषिकेश चव्हाण व राजश्री नितीन भालेराव यांनी सांगितले.