मंचर, ता. २२ : आंबेगाव तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत यंदा राजकीय चित्र कमालीचे गुंतागुंतीचे झाले असून, उमेदवारी न मिळाल्याने अनेक नेत्यांनी पक्षांतर केल्याने अनेक गट व गणांत तिरंगी- चौरंगी लढती अटळ ठरल्या आहेत. तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गटांसाठी २४, तर दहा पंचायत समिती गणांसाठी ५२ उमेदवार आहेत.
पारगाव- जारकरवाडी जिल्हा परिषद गटात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आंबेगाव तालुका महिला आघाडीच्या अध्यक्ष पूजा नीलेश वळसे व कार्याध्यक्ष दादाभाऊ थोरात (अवसरी बुद्रुक गट) यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी अनुक्रमे अपक्ष व भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कळंब- चांडोली बुद्रुक गटात शिवसेनेच्या प्रीती प्रवीण थोरात यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवली आहे.
एकंदर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व उद्धव ठाकरे शिवसेना हे पक्ष एकत्रित आले असून, भाजप व काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवली आहे. त्यामुळे मतदारांमध्ये कोण उमेदवार कोणत्या पक्षाचा व कोणत्या चिन्हावर लढत आहे, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. नेते- कार्यकर्त्यांना मतदारांपर्यंत निवडणूक चिन्ह नेत असताना मोठी कसरत करावी लागणार आहे.
पारगाव- जारकरवाडी गटात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) व अरुण गिरे (शिवसेना) यांच्यात मुख्य लढत आहे. दोघेही पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष असून, याआधीही या दोघांमध्ये थेट सामना झाला होता. राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने गिरे शिवसेनेत गेले आहेत. येथे किरण वाळूंज भाजपचे उमेदवार आहेत.
कळंब- रांजणी गटात माजी जिल्हा परिषद सदस्य तुलसी सचिन भोर (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रीती प्रवीण थोरात (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस), रेखा संदीप पोकळे (भाजप) अशी लढत होणार आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीतही भोर विरुद्ध थोरात, असा सामना झाला होता; मात्र यावेळी थोरात यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवत आहे. त्यांचे पती प्रवीण थोरात शिवसेना तालुकाप्रमुख आहेत.
पिंपळगाव अवसरी गटात विष्णू हिंगे (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रशांत अभंग (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस), प्रभाकर बांगर (स्वाभिमानी शेतकरी संघटना), तसेच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारल्याने भाजपकडून रिंगणात उतरलेले दादाभाऊ थोरात यांच्यात बहुरंगी लढत होत असून, ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे. विशेष म्हणजे अनेक नेत्यांनी आपल्या पत्नीलाच उमेदवारी दिली आहे.
घोडेगाव -पेठ गटात पुणे जिल्हा परिषद माजी शिवसेना गटनेते देविदास दरेकर यांच्या पत्नी सुवर्णा दरेकर (शिवसेना), आंबेगाव तालुका खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष नवनाथ हुले यांच्या पत्नी मंगल हुले (राष्ट्रवादी काँग्रेस) व कॉंग्रेसचे नेते अशोक काळे यांच्या पत्नी प्रतिभा काळे (काँग्रेस) यांच्यात तिरंगी लढत आहे.
शिनोली गटात शिला लोहकरे (राष्ट्रवादी काँग्रेस), सरिता साबळे (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस), शीतल भारमळ (काँग्रेस), अनिता आढारी (भाजप) व कमल बांबळे (कम्युनिस्ट पक्ष) अशी बहुपक्षीय लढत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.