ज्येष्ठ नेते शरद पवार कृषिमंत्री असताना २००४ ते २०१४ या काळात देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण तर झालाच शिवाय काही योजनांमुळे दीर्घकालीन फायदेही झाले. त्यामुळे देशातील शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्याचे काम झाले होते. सध्या दूध धंद्यासह कांदा, टोमॅटोपासून अन्य शेती उत्पादनांना पुरेसे दर मिळण्याची अपेक्षा आहे. शेतीला पूर्वीचे दिवस यावेत आणि पवारसाहेब व्हावेत कृषी मंत्री पुन्हा एकदा... अशी हाक आता अनेक शेतकरी देताना दिसून येतात.
- गौरव दिलीपराव जाधव,
कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, बारामती
पीक कर्जाचा व्याजदर १८ टक्के होता तो ४ टक्क्यांवर आला. काही जिल्ह्यांत तर शून्य टक्के दराने व्याज आकारण्यात आले. २०१२-१३ साली दुष्काळ निर्माण झाला, त्यावेळी चारा छावण्या देखील सुरू करण्यात आल्या होत्या, जनावरांच्या छावण्यांना पशुखाद्य आणि चारा पुरवण्यात आला. जळालेल्या फळबागांच्या उभारणीसाठी एकरी ३५ हजार रुपयांचे अनुदान दिले, पवारसाहेबांचा हा एक धाडसी निर्णय होता. नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन योजनेतून साडे दहा लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले. या कामाची नोंद काही आंतरराष्ट्रीय संघटनांनीही घेतली आहे. पवारसाहेबांची कार्यपद्धतच मुळात जनतेला आपलेसे करणारी आहे. ते आपुलकीनेच वागतात. साहेबांचा जनसंपर्क फार मोठा आहे. त्यांची कार्यकर्त्यांबरोबरची वागणूक कधीही बदलली नाही. कार्यकर्त्यांशी घरोबाही आहे. अगदी १९६०च्या दशकातील कार्यकर्त्यांबरोबरची त्यांची मैत्री आजही टिकून आहे. माणसे जोडण्याची कला त्यांच्याकडे आहे. त्यांचे ऐकून घेण्याची क्षमता मोठी आहे. त्यामुळे आलेल्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ते ऐकून घेतात आणि त्याचे समाधानही करतात. जिवाला जीव देणारी माणसे जोडली ती आजही त्यांच्याबरोबर आहेत. कित्येक घराण्यांतील दुसरी-तिसरी पिढी आज साहेबांबरोबर कार्यरत आहे. परिणामी, साहेबांना मतदारसंघात फिरायची कधी गरज भासली नाही. त्यामुळेच राज्यातील इतर मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करणे त्यांना शक्य होते. व्यक्तिगत संपर्क हे त्यांचे आणखी एक बलस्थान आहे. अनेक जुन्या नव्या कार्यकर्त्यांना ते नावानिशी ओळखतात. मतदारसंघातील गुणवान व्यक्ती, शेतकऱ्याचा जाहीर सभांमधून गौरव करतात. नवे तंत्र शोधणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतात अगर दुग्धोत्पादनात क्रांती करणाऱ्यांच्या थेट गोठ्यावर जाऊन ते स्वतः त्याची माहिती घेतात.
दिवाळी सणाच्यावेळी शरद पवार बारामतीत ठाण मांडून असतात. हा काळ कार्यकर्ते, नातेवाइकांसमवेत घालवतात. गेली कित्येक वर्षे त्यांचा हा नित्यक्रम आहे. इतका मोठा नेता आपल्याला कुठलाही आडपडदा न ठेवता भेटतो याचेच जनतेला अप्रूप वाटते. दिल्लीत, मुंबईत कुणी भेटायला गेला, तर त्याची आस्थेवाईकपणे चौकशी करत, त्याचे काम मार्गी लावतात. मतदारसंघातील गरजू, कलाकार खेळाडू यांच्या घराचा, तसेच अनेकांच्या नोकरीचा प्रश्न मार्गी लावला. पवार कुटुंबीयांशी संबंधित विविध सामाजिक संस्था असून, त्या माध्यमातून बारामतीत विविध उपक्रम सतत सुरू असतात. आरोग्य शिबिर, जलसंधारण, ओढा खोलीकरण, व्याख्यानमाला, भीमथडी यात्रा, कृषी प्रदर्शन, कम्युनिटी रेडिओ, वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप, शाळांची सुधारणा आदी उपक्रम राबविले जातात. त्यातूनही माणसे जोडण्याचे काम सातत्याने सुरू असते. माणसे जोडणे ही साहेबांची उत्तम कला आहे. त्यामुळेच आजवर ते अपराजित राहिले आहेत. अशा कर्तुत्ववान नेतृत्वाला दीर्घायुष्य लाभो...हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
शब्दांकन : कल्याण पाचांगणे, माळेगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.