माळेगाव, ता. २७ : येथील माळेगाव (ता. बारामती) कारखान्याच्या निवडणुकीसाठी मंगळवार (ता. २७) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २०० इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे एकूण ५९३ उमेदवारी अर्ज बारामती निवडणूक कार्यालयात प्राप्त झाले. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘ब’ वर्ग संस्था मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या श्रेष्ठींनी आपले उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी दाखल केले. त्यामध्ये अजित पवार (ब वर्ग मतदार संघ), बाळासाहेब तावरे (माळेगाव गट), केशवराव जगताप, राजेंद्र जगताप (पणदरे गट), अनिल तावरे, प्रकाश तावरे (सांगवी गट), सतीश तावरे (माळेगाव गट), रामदास आटोळे (खांडज गट), पोपटराव गावडे (बारामती गट) आदींचा समावेश आहे. बाळासाहेब तावरे (वय ८३) यांनी सुमारे २८ वर्षे कारखान्याच्या संचालकपदावर काम केले, तर अध्यक्षपदावर ते जवळपास १७ वर्षे कार्यरत होते. केशवराव जगताप (वय ७८) हे दोन वर्षापासून अध्यक्षपदावर काम करीत आहेत. त्यांना संचालकपदाचा १७ वर्षांचा अनुभव आहे. राजेंद्र जगताप यांना माळेगाव कारखान्यात अधिकारी म्हणून ३६ वर्षे काम केल्याचा अनुभव आहे. त्यामध्ये कार्यकारी संचालक म्हणून ते तीन वर्षे कार्यरत राहिले. तसेच, विरोधी गटाचे प्रमुख व उमेदवार चंद्रराव तावरे (वय ८५) हे ४५ वर्षांपासून माळेगाव कारखान्याच्या राजकारणाशी संलग्न आहेत. तसेच, रंजन तावरे (वय ७२) हे जवळपास तीस वर्षांपासून कारखान्याच्या राजकारणात सक्रिय आहेत.
दरम्यान, सहा गटातून शेवटच्या दिवशी मंगळवारी दोनशे, तर एकूण ५९३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामध्ये माळेगाव गटातून आजवर ५१, पणदरे गटातून ७९, सांगवी गटातून ५४, खांडज-शिरवली गटातून ६६, नीरावागज येथून ५९, बारामती गटातून ७९, महिला राखीव मतदार संघातून ६८, अनुसूचित जाती-जमाती गटामधून २०, भटक्या जातीमधून ६४, इतर मागास प्रवर्गातून २५ आणि ब वर्ग संस्था मतदार संघातून २८ उमेदवारी अर्ज आजवर दाखल झाले आहेत.
उमेदवारीने चर्चेला उधाण
माळेगाव कारखाना निवडणुकीत ब वर्ग मतदार संघातून अजित पवार यांचीही उमेदवारी जाहीर झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. बारामती खरेदी विक्री संघातून ते संस्था मतदार संघासाठी प्रतिनिधी म्हणून आले आहेत. त्यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून दत्तात्रेय येळे, तर अनुमोदक म्हणून सुनील पवार यांच्या सह्या आहेत. येळे यांनीच पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने व गणेश शिंदे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.