माळेगाव, ता.२१ : ‘‘ग्लोबल ते लोकल कृषी तंत्रज्ञान घेऊन आलेल्या आंतरराष्ट्रीय ‘कृषिक’ प्रदर्शनात स्टार्टअप्स आणि नवसंशोधकांनी सादर केलेले शेतीपूरक प्रकल्प आकर्षण ठरलेले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, कमी खर्चातील उपाय आणि शाश्वत शेतीच्या संकल्पनांमुळे हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे,’’ असे प्रतिपादन माजी कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी केले.
माळेगाव खुर्द (ता.बारामती) येथील कृषिक प्रदर्शनातील प्रात्यक्षिकयुक्त पिकांची पाहणी बुधवारी (ता.२१) खडसे यांनी केली. यावेळी त्यांनी प्रदर्शन पाहण्यास आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्मार्ट शेती, ड्रोनद्वारे फवारणी, माती परीक्षणावर आधारित पीक नियोजन, डिजिटल मार्केटिंग, प्रक्रिया उद्योग, सेंद्रिय व नैसर्गिक शेतीशी संबंधित स्टार्टअप्सची माहिती प्रत्यक्ष घेतली.
दरम्यान, नोकरीकडे न वळता शेती व्यवसायात काहीतरी वेगळे करायचे आणि आपल्या प्रयोगातून इतर शेतकऱ्यांनाही सक्षम करायचे, या विचारातून पश्चिम महाराष्ट्रासह विविध ठिकाणचे अनेक तरुण उद्योजक ‘कृषिक’मध्ये सहभागी झाले आहेत. कमी पाण्यात जास्त उत्पादन, खर्चात बचत, उत्पन्नवाढ आणि बाजाराशी थेट जोडणारी तंत्रे यावर आधारित प्रकल्पांनी संबंधितांचे लक्ष वेधून घेतले होते. शेतकरी केवळ कच्चा माल उत्पादक न राहता उद्योजक व्हावा, हा संदेश ‘कृषिक’ प्रदर्शनातून ठळकपणे दिला जात आहे, याबाबत खडसे यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
शेतीच्या जागतिक दर्जाच्या स्टार्टअपसाठी नीती आयोगाने निवड केलेल्या बारामती कृषी महाविद्यालयातील इनक्युबेशन व इनोव्हेशन सेंटरची उभारणी शेती क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. या केंद्रामुळे बारामती कृषी महाविद्यालय आता संशोधनापुरते मर्यादित न राहता नावीन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष उद्योगामध्ये रूपांतर करणारे जागतिक दर्जाचे केंद्र बनू पाहत आहे, असे मत अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांनी व्यक्त केले.
ग्लोबल स्तरावरील तंत्रज्ञान स्थानिक परिस्थितीनुसार कसे वापरता येईल, याची प्रत्यक्ष उदाहरणे या प्रदर्शनात पाहायला मिळत आहे. शेतीच्या भविष्यासाठी नव्या शक्यता निर्माण होत असल्याचे चित्र ‘कृषिक’मध्ये दिसून येत आहे.
- एकनाथ खडसे, माजी कृषिमंत्री
‘कृषिकमधील प्रयोग कर्नाटक घेऊन चाललो आहे’
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी, संशोधकांनी व स्टार्टअप्सनी विकसित केलेली तंत्रज्ञाने, उपकरणे आणि शेतीपूरक उपाय शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन, शाश्वत शेती, प्रक्रिया उद्योग, स्मार्ट शेती, डिजिटल तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धन यावर आधारित प्रकल्पांमुळे शेतीकडे उद्योग म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन बळावत आहे. येथील स्टार्टअप्स स्थानिक गरजांवर आधारित असून, जागतिक बाजारपेठेतही स्पर्धा करण्यास सक्षम ठरणारे आहेत. त्यामुळे हे बदलते कृषिक प्रदर्शनातील प्रयोग आम्ही महाराष्ट्राची सीमा ओलांडून कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांसाठी घेऊन चाललो आहे, असे विरोगोंडा पटेल (कर्नाटक) या शेतकऱ्यांनी सांगितले.
03068, 03067
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.