माळेगाव, ता. २९ ः माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद व्हावी, असा गळीत हंगाम यंदा चालू आहे. या कारखान्याचे दिवंगत अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली आजवर सुमारे आठ लाख टन उसाचे क्रशिंग यशस्वीरीत्या पूर्ण झाले. वेळेत आणि शिस्तबद्ध गाळपामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. अशा प्राप्त स्थितीतच विमान अपघातामध्ये या कारखान्याचे अध्यक्ष अजित पवार यांचे निधन झाले. त्यामुळे माळेगावचे प्रशासन व सभासद पूर्णतः पोरके झाले.
विशेषतः अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याने सरासरी ११.११ टक्के रिकव्हरी साध्य करत उल्लेखनीय कामगिरी केली. ऊस वेळेवर गाळप होत असल्याने वाहतूक खर्चात बचत, वजनकाट्यावर पारदर्शकता आणि पेमेंटबाबत विश्वासार्हता निर्माण झाली होती. त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाला सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता.
कारखान्याच्या उपाध्यक्षा संगीता कोकरे यांच्यासह संचालक मंडळाने अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली केवळ साखर उत्पादनावरच भर न देता, वीजनिर्मिती, इथेनॉल, मोलॅसिस, प्रेसमड व इतर उपपदार्थ निर्मितीतही उच्चांक प्रस्थापित केला. त्यामुळे कारखान्याच्या आर्थिक स्थैर्याला बळ मिळाले असून, माळेगाव कारखाना राज्यातील आदर्श सहकारी संस्थांच्या यादीत अग्रक्रमावर पोहोचवण्याचा प्रयत्न पवार यांनी केला. परंतु, ते गेल्याने त्यांचे स्वप्न अधुरे राहिले. ते स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आता कार्यरत संचालक मंडळावर येऊन ठेपली आहे.
कारखान्याचा विस्तार, यांत्रिकीकरण, कामगार कल्याण आणि सभासद हिताच्या निर्णयांमुळे माळेगाव कारखाना प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असतानाच, अजित दादा आज अचानक ‘अनंतात विलीन’ झाले. त्यांच्या जाण्याने कारखान्याच्या प्रगतिपथावर असलेल्या प्रवासाला भावनिक धक्का बसला आहे.
- योगेश जगताप, संचालक, माळेगाव साखर कारखाना
अजित दादांच्या नेतृत्वाखाली घडलेली सहकाराची ही यशोगाथा आम्ही थांबू देणार नाही. त्यांच्या आठवणी, निर्णय आणि दूरदृष्टी कारखान्याच्या प्रत्येक यंत्रात आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात कायम राहणार आहेत. त्यांच्या पश्चात माळेगाव साखर कारखान्याचे सुमारे २२ हजार सभासद पोरके झाले असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
- नितीन सातव, शिवराज जाधव, संचालक, माळेगाव साखर कारखाना
सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणणारा नेता हरपल्याची भावना व्यक्त होत असली, तरी त्यांनी उभारलेली मूल्यव्यवस्था आणि सहकाराचा वारसा पुढील पिढीला दिशा देत राहील.
- ॲड. केशवराव जगताप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.