मोरगाव, ता. १० : बारामतीच्या जिराईत पट्ट्यात ओढा खोलीकरणाचे काम व जलस्रोत बळकटीकरणाची कामे केल्यायामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक जलस्रोतांद्वारेच शेतीसाठी शाश्वत पाण्याचा आधार मिळाला आहे.
टँकरग्रस्त गावात सकाळ माध्यम समूह, बर्ड एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया, शरयू फाउंडेशन, पाणी फाउंडेशन, जैन संघटना यांच्यासह विविध अशासकीय संस्था यांच्या माध्यमातून ओढा खोलीकरणाचे काम २०१४ पासून दरवर्षी सातत्याने झाले आहे.
नुकताच मॉन्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर या गावांमधील ओढे-नाले तुडुंब भरले आहेत. दरवर्षी खरीप हंगामात पुरेसा पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई निर्माण होते. शिवाय या भागात परतीचा पाऊस सप्टेंबर महिन्यातच पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामावरती समाधान मानावे लागते.
मात्र गेल्या पन्नास वर्षांच्या इतिहासात प्रथमच मे महिन्यात पावसाळ्यासारखा पाऊस या भागामध्ये पडला, शिवाय या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान न होता खरीप हंगामासाठी पूरक असे पाणीसाठे तयार झाले. यापूर्वी नाझरे जलाशयातून अतिरिक्त पाणी सोडल्यानंतरच कऱ्हानदी वाहत असल्याचे चित्र होते. मात्र यंदा प्रथमच पावसाच्या पाण्याने नदी दुथडी भरून वाहत आहे.
बारामती जलसंधारण विभागाच्या नियंत्रणाखाली पानसरेवाडी, बाबुर्डी, काऱ्हाटी, मुर्टी या गावांमध्ये गेली दोन वर्षांत जवळपास २२ ठिकाणी कामे ओढा खोलीकरणाची पूर्ण केली आहेत. जवळपास १४ ते १५ किलोमीटर ओढा खोलीकरण काम या गावांचे मिळून झाले असून या स्रोतांची पाणी साठवणूक क्षमता २५.२३ दशलक्ष घनमीटर व ७२१ टीसीएम अशी असल्याची माहिती जलसंधारण विभागाचे शाखा अभियंता योगेश बांगर यांनी दिली.
बारामतीच्या पट्ट्यात ६७ गावे टंचाईग्रस्त म्हणून शासनाने घोषित केली होती. यामधील ८० टक्के गावांमध्ये आज पाण्याचे वेगवेगळे स्रोत ओढा खोलीकरण व जलस्रोत बळकटीकरणाची सिमेंट बंधाऱ्यांसह इतर कामे यामुळे उपलब्ध असल्याची माहिती लोणी भापकरचे माजी सरपंच रवींद्र भापकर, भिलारवाडीचे माजी सरपंच कल्याण चव्हाण, गणेश भिसे, भगवान धायगुडे, विकास तावरे, आंबी बुद्रुकचे माजी सरपंच प्रवीण शिर्के यांनी दिली.
ओढा खोलीकरण ठिकाणी ओढ्याच्या दोन्हीही बाजूला अर्धा किलोमीटरच्या अंतरावरील विहिरींना थेट फायदा होत असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे टँकरग्रस्त व दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या या भागातील अनेक गावांमध्ये पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध झाल्याचे समाधान शेतकरी वर्गांमधून व्यक्त होत आहे.
पावसाच्या पाण्यामुळे ओढ्यात गाळ साचून राहण्याचा प्रकार होणार असून स्थानिक प्रशासन, सामाजिक संस्था, जलसंधारण विभाग यांनी उन्हाळ्यात दरवर्षी खोलीकरण झालेल्या ठिकाणचा गाळ काढण्याची तरतूद करावी, अशी अपेक्षाही शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामांना फायदा
शेतीसाठी पाणी महत्त्वाची गरज आहे. मात्र मुबलक पाणीसाठा हा पावसावर अवलंबून असून पावसाच्या पाण्याचा पडणारा प्रत्येक थेंब न थेंब शिवारात अडविण्यासाठी व मुरविण्यासाठी व शेतकऱ्यांना फायदा मिळण्यासाठी ओढा खोलीकरण व जलस्रोत बळकटीकरणाची कामे अतिशय प्रभावी माध्यमे ठरली आहेत. त्यामुळे काम केलेल्या सर्व यंत्रणांचे शेतकरी कायम ऋणी राहतील अशी प्रतिक्रिया मोढव्याच्या सरपंच शीतल मोरे, मासाळवाडी चे सरपंच मुरलीधर ठोंबरे, मुर्टीच्या सरपंच कोमल जगताप, उपसरपंच किरण जगदाळे यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.