माळशिरस, ता. १२ : शिव शंकराचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथे श्रावणातील दुसऱ्या सोमवारी ५० हजारांहून अधिक भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेत कावडींच्या मिरवणुकीचा आनंद लुटला.
श्रावणातील दुसऱ्या सोमवारनिमित्त मंदिर परिसरातील पंचक्रोशीतील गावांमधील तरुण शिवभक्तांनी रात्री बारानंतरच परिसरामध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली. शिवलिंगास येथील पवित्र टाक्यांमधील पाण्याने स्नान घालण्यासाठी शिवभक्त उपस्थित होते.
पहाटे तीन वाजता मानकऱ्यांच्या उपस्थितीत शिवलिंगावर दही, दूध, पंचामृताने स्नान घालून अभिषेक घालण्यात आला. शिवलिंगावरती फुलांची सजावट करण्यात आली. पहाटे पाच वाजता श्रावणी सोमवारनिमित्त जिल्हा परिषद पुणेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, पंढरपूरचे प्रांताधिकारी इथापे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली. या वेळी माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, माळशिरसच्या सरपंच आरती यादव, उपसरपंच अशोक यादव, पुरंदर तालुका युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष माऊली यादव, भुलेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अरुण यादव, हभप लक्ष्मण महाराज यादव, नवनाथ यादव उपस्थित होते.
देवाची पालखी दुपारी बारा वाजता पाण्याच्या कुंडाजवळ आली. प्रमुख मानकरी, माळशिरस ग्रामस्थांच्या उपस्थितीत स्नान घालण्यात आले. महाआरती होऊन कावड मिरवणूक काढण्यात आली. भजनाच्या तालावर पालखी मिरवणूक काढण्यात आली. दुपारी ‘हर हर महादेव’च्या गजरामध्ये कावडी मंदिराकडे जात असताना तल्लीन होऊन नाचणारे शिवभक्त गुलालाची मुक्त उधळण करीत होते. अडीच वाजता भुलेश्वर देवस्थानच्या प्रवेशद्वारावर मानाच्या कावडींची धार घालण्यात आली. देवाचा छबिना वाजत गाजत मुख्य शिवलिंगाजवळ आला. प्रमुख मानकरी आणि माळशिरस ग्रामस्थांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.
मंदिर परिसरामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पायथ्या लगत असणाऱ्या वनविभागाच्या हद्दीबाहेरच वाहने पार्क करण्यात आली. यात्रा नियोजनामध्ये जेजुरी पोलिस ठाण्याच्या वतीने पुरेसा बंदोबस्त देण्यात आला. माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने दिवसभर आरोग्य सेवा देण्यात आली. माळशिरस ग्रामपंचायतीच्या वतीने दिवसभर फिल्टरचे पाणी पुरविण्यात आले. भुलेश्वर अन्नदान मंडळाच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.