हिर्डोशी, ता.२७ : भोरचा आठवडा बाजार असलेला दिवस व गणेशोत्सवाची खरेदी यासाठी मंगळवारी (ता. २६) भोर शहरातील आठवडे बाजारात झालेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञाताकडून मोबाईल चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी सहा जणांनी मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रार भोर पोलिस ठाण्यात दिली आहे.
भोरच्या आठवडे बाजारात मोबाईल गहाळ, चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत असतात. त्यात मंगळवारी गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारात चांगलीच गर्दी झाली होती. याच गर्दीत हे मोबाईल चोरीला गेले आहेत. नुकताच आठ दिवसांपूर्वी खरेदी केलेला मोबाईल चोरीला गेला असल्याचे निगुडघर येथील विष्णू मळेकर यांनी सांगितले. भोरमधील सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच संध्याकाळच्या वेळेस खांबावरील वीज दिवे नसलेल्या ठिकाणी मोबाईल गहाळ होत आहेत. पोलिस विभाग व नगरपरिषदेने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. रामचंद्र बारमुख (रा.नाटंबी), विलास शेडगे (रा.उत्रौली), दिलीप जेधे (रा.जेधेवाडी), विष्णू मळेकर (रा.निगुडघर), शंकर माने (रा.भोर), रघुनाथ मोरे (रा.आंबवडे) यांनी मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार भोर पोलिस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार करीत आहेत.