हिर्डोशी, ता. २६ : भोर- महाड मार्गावरील आंबेघर (ता. भोर) हद्दीत रस्त्यावर धोकादायक खड्डा पडला आहे. तसेच, रस्त्यावर खडी आल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून असलेल्या दुरवस्थेकडे प्रशासन, ठेकेदार यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
भोर- महाड मार्गाच्या रुंदीकरणासाठी जागोजागी खोदकाम केले जात आहे. पावसाळ्यात भोरकडून जाताना आंबेघरच्या अलीकडील उतारावर डाव्याबाजूने अर्ध्या रस्त्यापर्यंत खोदकाम केले. त्यानंतर तेथे मुरूम व खडी टाकून बुजविण्यात आले. मात्र, तेथील खडी नुसती टाकलेली आहे. त्यावर रोलिंग केले नसल्याने तेथून वाहने जात नाहीत. त्यात मध्यभागी एक खड्डा असून, तेथे लाकूड रोवले आहे. पर्यायी उजव्याबाजूने दोन्ही बाजूची वाहने ये- जा करत आहेत. मात्र, अरुंद रस्ता असल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे.
अपघात झाला तर जबाबदार कोण?
आंबेघरच्या हद्दीत धोकादायक ठिकाणी कोणतेही सूचनाफलक नाहीत. त्यामुळे रस्त्यावर अचानक दिसणाऱ्या खडीमुळे वाहनांवर नियंत्रण ठेवणे अवघड होत आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. शुल्लक काम असूनही दुर्लक्ष का केले जाते आहे? प्रशासन एखाद्या अपघाताची वाट पाहतेय का? अपघात झाला तर जबाबदार कोण? असे संतप्त प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार केली होती. मात्र, त्यांच्याकडून हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी दररोज अपघात होत आहेत, तरी संबंधित विभागाकडून योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.
- अश्विनी संदीप खोपडे, सरपंच, आंबेघर
संबंधित ठेकेदारांना वाहतूक सुरक्षित राहण्यासाठीच्या उपाययोजना व काम चालू असलेल्या ठिकाणी सूचनाफलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महामार्ग हद्दीतील निगुडघरपर्यंतचे शेतकरी कामास विरोध करत असल्याने काम रखडत आहे.
- राहुल कुलकर्णी, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी
02821
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.