हिर्डोशी : हिर्डोशी (ता.भोर) येथील समर्थ रामदास स्वामी विद्यालयात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने पोषण आहार शिजवण्यासाठी लागणारे पाणी विद्यार्थांना पायपीट करत आणावे लागले. याची चर्चा होताच ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारी (ता. २६) नादुरुस्त जलवाहिनीची दुरुस्ती करून पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्यात आला. मुख्याध्यापिका अनिता हांडे यांनी जलवाहिनी दुरुस्तीबाबत तातडीने ग्रामपंचायतीकडे मागणी केली. यावर सरपंच बबन मालुसरे, ग्राम विकास अधिकारी अनिल अभंग, शिक्षक व ग्रामस्थांच्या मदतीने पाणीपुरवठा सुरू करून पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आला. याबाबत मुख्याध्यापिका हांडे यांनी सांगितले की, रस्त्याच्या कामा दरम्यान पाण्याची वाहिनी विस्कळीत झाली आहे. शाळा गावापासून लांब व टेकडीवर असल्याने पाण्याची वाहिनी नादुरुस्त होत असते. त्यातून शाळेकडे येणारा रस्ता भोर महाड रस्त्याच्या कामामुळे सध्या बंद आहे. त्यामुळे पाण्याचा टँकर आणता येत नव्हता. पर्यायी व्यवस्था नसल्याने विद्यार्थी शिक्षकांसह पाणी आणण्यास गेले होते. तातडीने जलवाहिनी दुरुस्ती करत पाणीपुरवठा सुरळीत केला आहे.