नारायणगाव, ता. ७ : ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे ग्लोबल जिल्हा कृषी महोत्सव २०२५ चे आयोजन ९ ते १२ जानेवारी २०२५ दरम्यान आयोजन केले आहे. कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी सकाळी ११ वाजता राज्याचे कृषी मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष, कृषिरत्न अनिल मेहेर यांनी दिली.
उद्घाटन कार्यक्रमास खासदार मा. डॉ. अमोल कोल्हे, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, अटारी पुणेचे संचालक डॉ. एस. के. रॉय, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जिल्हा बँकेचे संचालक ॲड.संजय काळे, आशा बुचके आदि मान्यवरांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहणार आहेत.
कृषी महोत्सवानिमित्त कृषी विज्ञान केंद्राच्या ८० एकर प्रक्षेत्रावर एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल, परसबाग, पोषण बाग, नैसर्गिक शेती पीक प्रात्यक्षिके व निविष्ठा निर्मिती, विविध फळ, फुल व भाजीपाला पिकांचे विविध डेमो प्लॉटस, चायनीज भाजीपाला पिकातील विविध नावीन्यपूर्ण प्रात्यक्षिके, चारापिके, कोंबडीपालनाच्या विविध जाती, तृणधान्य पिकांचे प्रात्यक्षिके, ड्रोन द्वारे सेंद्रिय निविष्ठा फवारणी प्रात्यक्षिके प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे. कृषी प्रदर्शनात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांची विविध दालने, शासनाच्या कृषी विषयक विविध योजना, उपक्रमांची माहिती, संशोधित कृषी तंत्रज्ञान नावीन्यपूर्ण शेतीतील बाबी, प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव, विक्री व्यवस्थापन, कृषिपूरक व्यवसाय इत्यादींची पूरक माहिती दिली मिळणार आहे. तसेच कृषी विषयक परिसंवाद, अनुभवी शेतकरी - यशस्वी उद्योजकांचे व्याख्याने, महिला मेळावा, शास्त्रज्ञ-तंत्रज्ञ व विचारवंत यांची थेट भेट या कृषी प्रदर्शनातून होणार आहे. शासकीय व खासगी क्षेत्रातील नामांकित कृषी निविष्ठा, कृषी साहित्य, कृषी अवजारे, उत्पादक कंपन्यांची उत्पादने कृषी प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. कृषी प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि उत्कृष्ट कामगिरी केलेल्या प्रगतशील शेतकऱ्यांचा ग्रामोन्नती कृषी सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी प्रा. राहुल घाडगे (९४२२०८००११) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन केंद्राचे प्रमुख डॉ. प्रशांत शेटे यांनी केले आहे.
कृषी महोत्सवासाठी नाबार्ड, आत्मा कृषी विभाग, जिल्हा परिषद पुणे, भीमाशंकर व विघ्नहर सहकारी साखर कारखाना, कृषी पणन मंडळ, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बँक ऑफ इंडिया यांनी विशेष सहकार्य केले आहे.
ग्लोबल जिल्हा कृषी महोत्सव २०२५ कार्यक्रम पुढील प्रमाणे: ९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वा. उद्घाटन. १० जानेवारी : सकाळी ११.०० वाजता नैसर्गिक शेती विषय तर दुपारी निर्यातक्षम केळी तंत्रज्ञान व समूह शेती परिसंवाद.११ जानेवारी : सकाळी ११.०० वा. महिला मेळावा व कृषी आधारित व्यवसायांचे डिजिटल विक्री व्यवस्थापन मार्गदर्शन. १२ जानेवारी : सकाळी जांभूळ लागवड तंत्रज्ञानाविषयी चर्चासत्र, दुपारी २ वाजता समारोप.
धान्य महोत्सवाचे आयोजन
शेतकऱ्याना थेट बाजार पेठ उपलब्ध व्हावी उद्देशाने फळे, भाजीपाला आणि धान्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी वेगवेगळ्या सेंद्रिय डाळी, विविध भरडधान्य विक्री या ठिकाणी होणार आहे. महिला बचत गटांमार्फत तयार केलेले लोणचे, पापड, मसाले, कुर्दी पापड्या, मिलेटसचे पदार्थ आदी गोष्टी आणि खवय्यांसाठी शाकाहारी व मांसाहारी उपलब्ध असणार आहे.
06051
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.