नारायणगाव, ता. ६ : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून निर्जनस्थळी नेऊन शिवीगाळ, मारहाण करून मित्रावर चाकू हल्ला केल्याप्रकरणी नारायणगाव (ता. जुन्नर) पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला. आरोपी फरारी झाले आहेत, अशी माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
या प्रकरणी राजकुमार उमानंद ऋषीदेव (वय २३, रा. नारायणगाव, मूळ राहणार बिहार, व्यवसाय जेसीबी चालक) याने दिलेल्या फिर्यादीवरून तेजस शेळके (वय २४, रा. कोल्हे मळा, नारायणगाव) व त्याचा मित्र (नाव माहीत नाही) यांच्यावर नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
तेजस शेळके व राजकुमार ऋषीदेव हे दोघे मित्र आहेत. ‘माझ्याकडे खूप पैसे आहेत; आपण पार्टी करू. तू आमच्यासोबत चल,’ असे म्हणून तेजस शेळके व त्याच्या मित्राने राजकुमार ऋषीदेव याला २ ऑगस्ट रोजी मोटरसायकलवर वारूळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील ठाकरवाडी रस्त्यालगत असलेल्या निर्जन ठिकाणी घेऊन गेले. त्यानंतर तेजस याने राजकुमार याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. राजकुमार याने पैसे न दिल्यामुळे तेजस व त्याच्या मित्राने राजकुमार याला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर जमिनीवर खाली पाडून तेजस याने राजकुमार याच्यावर चाकू हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीत राजकुमार याचा मोबाईल व तीन हजार रुपये गहाळ झाले आहेत. याप्रकरणी दोन जणांवर नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.