नारायणगाव, ता. १२ : मे ते सप्टेंबर दरम्यान सततचा पाऊस, अतिवृष्टी, ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे जुन्नर तालुक्यातील द्राक्ष बागांमध्ये घडनिर्मितीवर परिणाम झाला आहे. द्राक्ष बागांच्या फळ छाटणीनंतर काड्यांमधून घड बाहेर न पडल्याने जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक अडचणीत सापडले आहेत.
निर्यातक्षम जम्बो जातीच्या द्राक्ष बागांमध्ये घड निर्मिती न होण्याचे प्रमाण इतर जातीच्या द्राक्षाच्या तुलनेत जास्त आहे. यामुळे सुमारे दीड हजार एकर क्षेत्रातील जम्बो द्राक्षाचा हंगाम वाया जाणार असल्याने द्राक्ष उत्पादकांना या हंगामात कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे. कृषी विभागाने द्राक्ष बागांची पाहणी करावी. वस्तुनिष्ठ पंचनामे करून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघाच्या वतीने केली आहे.
याबाबतचे निवेदन कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके यांना देण्यात आले आहे. माजी आमदार बेनके यांच्या उपस्थितीत रविवारी (ता.१२)तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांची बैठक झाली. यावेळी संदीप वारुळे, अवधूत बारवे, दीपक वायकर, जयसिंग वायकर, गणेश गाडेकर, रोहन पाटे, अमोल पाटे विकास ढवळे, दिलीप भोर,विलास पाटे, शशिकांत कानडे,गौतम खैरे आदी द्राक्ष उत्पादक शेतकरी होते.
वारुळे, बारवे, वायकर म्हणाले की, जुन्नर तालुक्यात जम्बो, रेडग्लोब, शरद सीडलेस, क्रिमसन, किंगबेरी, फ्लेम, तास ए गणेश, सोनाका आदी जातीच्या द्राक्ष बागा खाली सुमारे साडेतीन हजार एकर क्षेत्र आहे. द्राक्ष पट्ट्यात मे ते सप्टेंबर दरम्यान सरासरी १०५६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. अतिवृष्टी, सततचा पाऊस,ढगाळ वातावरण यामुळे द्राक्ष बागांची छाटणी झाल्यानंतर प्रामुख्याने जम्बो, किंगबेरी या जातीच्या बहुतेक द्राक्ष बागांमध्ये घड निर्मिती झाली नाही.
दरम्यान, नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करून पंचनामा करण्याची मागणी केली असता द्राक्ष बागांचे पंचनामे करण्याचा शासनाचा आदेश नसल्याचे तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी सांगितले.
दरम्यान, कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांची भेट घेऊन द्राक्ष उत्पादकांच्या समस्या सांगितल्या जातील. अतिवृष्टीमुळे घड निर्मिती न झालेल्या द्राक्ष बागांचे पंचनामे करण्यासाठी आदेश काढावा असा आग्रह धरला जाईल., असे माजी आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.
दृष्टिक्षेपातील सध्या स्थिती
१. आरा ३५, आरा ३६, शरद सीडलेस या द्राक्ष बागेमध्ये समाधानकारक घड निर्मिती
२. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका जम्बो जातीच्या द्राक्ष बागांना बसला
३. घड निर्मितीने न झाल्याने या द्राक्ष बागांचा हंगाम वाया जाणार
४. द्राक्ष माशागतीसाठी एकरी अडीच ते तीन लाख रुपये खर्च
५. जम्बो बागा फेल गेल्याने द्राक्ष उत्पादक सापडले अडचणीत
शासन निर्णयानुसार फळे असलेल्या फळझाडांचेच पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. यामध्ये द्राक्ष पिकाचा समावेश नव्हता. पंचनामे झाले त्या वेळेला द्राक्ष बागांचे दृश्य स्वरूपात नुकसान दिसले नाही. जुन्नर तालुक्यातील काही बागांची पाहणी केली आहे. अतिवृष्टीमुळे बहुतेक जम्बो जातीच्या द्राक्ष बागेत घड निर्मिती झाली नाही तर काही ठिकाणी कमी प्रमाणात झाली आहे. फळधारणा न झालेल्या द्राक्ष बागांचे पंचनामे करण्याचे फेर आदेश आल्यास
पंचनामे करता येतील.
- सतीश शिरसाट, उपविभागीय कृषी अधिकारी
07327
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.