पुणे

जुन्नरमध्ये मातब्बरांच्या तयारीवर पाणी

CD

नारायणगाव, ता. १३ : जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आठ गट आहेत. आरक्षणानुसार नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटासाठी चार गट, अनुसूचित जमाती महिला गटासाठी दोन, तर सर्वसाधारण गटासाठी दोन गट आरक्षित केले आहेत. त्यामुळे आठ गटापैकी सहा गटातून महिलांना जिल्हा परिषद सदस्य होण्याची संधी मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे अनेक मातब्बर आजी, माजी व प्रबळ इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या तयारीवर पाणी पडले असून, जिल्हा परिषद सदस्य होण्याचे स्वप्न भंगले आहे. मात्र असे असले तरी इच्छुक आपल्या पत्नी, सूनबाई व अन्य जवळचे नातेवाईक यांना रिंगणात उतरविण्याच्या तयारीला लागले आहेत. कुणबी प्रमाणपत्र असलेले सर्वसाधारण गटातील काही इच्छुक नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. बारव -तांबे गटातून देवराम लांडे यांची संधी हुकली असली, तरी ते सूनबाई माया लांडे यांना निवडणूक रिंगणात उतरवणार आहेत.
जाहीर झालेल्या आरक्षणामुळे पांडुरंग पवार, देवराम लांडे, अंकुश आमले,मोहित ढमाले, माऊली खंडागळे या माजी जिल्हा परिषद सदस्यांना धक्का बसला असून, योगेश पाटे, वल्लभ शेळके, पंकज कणसे, मकरंद पाटे, रमेश मेहत्रे या इच्छुक असलेल्या मातब्बर उमेदवारांचे जिल्हा परिषद सदस्य होण्याचे स्वप्न भंगले आहे. मात्र, पाटे, शेळके, कणसे यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र असल्याने ते त्यांच्या पत्नीना निवडणूक रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत.
सावरगाव-कुसूर व आळे-पिंपळवंडी या दोन गटाचे आरक्षण सर्वसाधारणसाठी जाहीर झाल्याने सावरगाव -कुसूर गटातून माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, आशा बुचके यांना, तर आळे- पिंपळवंडी गटातून शरद लेंडे यांना निवडणूक लढविण्याची पुन्हा संधी मिळाली आहे.
सन २०१७ च्या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षात चुरशीची निवडणूक झाली होती. मात्र सद्यःस्थितीत परिस्थिती बदलली आहे. जुन्नर तालुक्यात प्रभाव असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात फूट पडली आहे. यामुळे उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पूर्वी दुरंगी व तिरंगी होणारा सामना आता चौरंगी, पंचरंगी होण्याची शक्यता आहे.
नारायणगाव- वारूळवाडी व सावरगाव- कुसूर या दोन्ही गटातून आशा बुचके या चार वेळा जिल्हा परिषद सदस्य झाल्या आहेत. सावरगाव- कुसूर सर्वसाधारण गटासाठी तर नारायणगाव- वारूळवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटासाठी राखीव झाला आहे. बुचके यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे. त्यामुळे त्या कोणत्या गटातून निवडणूक लढवतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

गटनिहाय आरक्षण
उदापूर-डिंगोरे गट- अनुसूचित जमाती महिला, ओतूर- धालेवाडीतर्फे हवेली- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, आळे- पिंपळवंडी गट- सर्वसाधारण, बेल्हे- राजुरी गट- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, बोरी बुद्रुक- खोडद गट- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, नारायणगाव- वारूळवाडी गट- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सावरगाव- कुसूर गट- सर्वसाधारण, बारव -तांबे गट- अनुसूचित जमाती महिला.

मागील पक्षीय बलाबल
राष्ट्रवादी कॉंग्रेस- ४, शिवसेना- ३.

प्रमुख समस्या
बिबट्यांचे पाळीव जनावरे व मानवावर वाढलेले हल्ले, रस्त्यांची झालेली दुरवस्था, सोयाबीन, कांदा, बटाटा या शेतीमालाला बाजार भावाचा अभाव, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव.

Bihar NDA Latest Update : बिहारमध्ये निवडणुकीआधीच ‘NDA’त खेला! नितीश कुमारांनी चिराग पासवान यांच्या जागांवर दिले उमेदवार

Mohammad Shami: 'मी जर रणजी खेळू शकतो, तर वनडे का नाही?' ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीचा थेट प्रश्न

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Maharashtra Politics : विजय वडेट्टीवारांचा आरोप; सत्ताधारी महायुती निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात; अजित पवारांच्या पक्षाची धर्मनिरपेक्षता खोटी

क्रिकेटला वेस्ट इंडिजची नव्हे, जगाला त्यांची गरज...; गौतम गंभीर स्ट्रेट टू हार्ट, पाहुण्यांच्या ड्रेसिंग रूममधील Video

SCROLL FOR NEXT