नारायणगाव, ता.२९: शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून उत्पादित केलेल्या सोयाबीनची चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा पोलिस पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून १ लाख ३७ हजार २०० रुपये किमतीचे चारशे किलोग्रॅम सोयाबीन व दोन मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस उपनिरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
या प्रकरणी सागर रमेश जाधव (वय २२), समीर संतोष भालेकर (वय २१), आकाश बाळशीराम काळे (वय १९), दीपक गौतम काळे (वय २६, सर्व रा. एकनाथ वाडी, चास, ता. आंबेगाव) यांना अटक झाली आहे. जुन्नर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकनाथ वाडी येथील सुदर्शन रामचंद्र मनसुख (वय ४१, व्यवसाय शेती रा. एकनाथ वाडी सावरगाव) यांनी सोयाबीनची मळणी झाल्यानंतर एक टन सोयाबीन शेतामध्ये झाकून ठेवले होते. अज्ञाताने १४ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सोयाबीनची चोरी केली होती. या प्रकरणी मनसुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जुन्नर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोयाबीनसह कांदा, डाळिंब व इतर शेतमाल चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने या चोरीचा तपास तातडीने करावा, असे आदेश पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे पथकाला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सीसीटीव्ही फुटेज व बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले. त्यांने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून चोरी केलेली सोयाबीन, चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन मोटरसायकली असा १ लाख ३७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. हा तपास पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, किरण अवचर, सहाय्यक पोलिस निरीक्षक शेलार, पोलिस अंमलदार दीपक साबळे, राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले यांनी केला.
07542
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.