नारायणगाव, ता. २७ : धाकट्या भावाच्या दशक्रिया विधीसाठी निघालेल्या थोरल्या भावाचे हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी (ता. २७) सकाळी निधन झाले. ही हृदयद्रावक घटना वारूळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील आनंदवाडी येथे घडली. १० दिवसांच्या अंतराने कुटुंबातील कर्त्या दोन सख्ख्या भावांचे निधन झाल्याने भुजबळ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आनंदवाडी येथील जितेंद्र दिलीप भुजबळ(वय ५१) यांचे नारायणगाव बस स्थानकाजवळ विघ्नहर मेडिकल हे औषधाचे दुकान आहे. त्यांचा धाकटा भाऊ किशोर(वय ४५) यांचे बुधवारी (ता. १७) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे. नारायणगावातील मीना नदी काठावर किशोर यांचा शनिवारी सकाळी सात वाजता दशक्रिया विधी होता. धाकट्या भावाच्या दशक्रिया विधीनिमित्त आयोजित सर्व धार्मिक विधीची तयारी थोरला भाऊ जितेंद्र यांनी केली होती. भुजबळ कुटुंबीय व नातेवाईक सकाळी सात वाजता दशक्रिया विधीसाठी मीना नदी काठावर निघण्याच्या तयारीत होते. दरम्यान, पावणेसात वाजता जितेंद्र यांना छातीत दुखू लागले. तातडीने त्यांना घरा शेजारील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच हृदयविकाराने जितेंद्र यांचे निधन झाले. धाकट्या भावाचा दशक्रिया विधी होण्यापूर्वीच थोरल्या भावाचे निधन झाल्याने ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे. जितेंद्र यांच्या मागे पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. दहा दिवसांच्या अंतराने घरातील दोन्ही कर्ते पुरुष गेल्याने भुजबळ कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. येथील माजी सैनिक डी. के. भुजबळ यांचे ते पुतणे होत. शनिवारी दुपारी तीन वाजता जितेंद्र यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
बदलत्या जीवनशैलीमुळे तरुण वयातच हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी धूम्रपान टाळावे, संतुलित आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण, ताण कमी करण्यासाठी योगा, मेडिटेशन, नियमित रक्तदाब, कोलेस्टेरॉल, हृदय चाचणी, मधुमेह नियंत्रण आदी उपाययोजना कराव्यात.
- डॉ. अनिल शेवाळे, प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ
7654
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.