रवींद्र पाटे : सकाळ वृत्तसेवा
नारायणगाव, ता. २३ : जुन्नर तालुक्यात यावर्षी रब्बी हंगामात १३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात विक्रमी कांदा लागवड झाली आहे. मार्च महिन्यात कांदा पिकाची काढणी सुरू होणार आहे. सध्या कांद्याला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कांदा काढणीसाठी एकरी २० ते २५ हजार रुपयांचा खर्च कसा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. सध्या मिळणारा बाजारभाव व उत्पादन खर्चाचा विचार करता सध्याच्या बाजारभावात शेतकऱ्यांना एकरी ४० ते ५० हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
तालुक्यात रब्बी हंगामात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पावसाळी हंगामात लागवड केलेल्या कांद्याची सद्यःस्थितीत काढणी सुरू आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा, ओतूर व जुन्नर बाजारात नवीन लाल कांदा विक्रीसाठी येत आहे. एकरी सात ते आठ टन उत्पादन निघत आहे. प्रतवारीनुसार कांद्याला सध्या नऊ रुपये ते पंधरा रुपयांच्या दरम्यान बाजारभाव मिळत आहे. मार्च महिन्यात रब्बी कांद्याची काढणी सुरू झाल्यानंतर आवक वाढणार असून बाजारभावात अजून घट होण्याची शक्यता आहे. वाढलेल्या भांडवली खर्चाचा विचार करता कांद्याला किमान २० रुपये बाजारभाव मिळावा. यासाठी केंद्र शासनाने योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी कांदा उत्पादक करत आहेत.
मागील तीन वर्षाचा आढावा घेता तालुक्यात रब्बी हंगामात नऊ ते अकरा हजार हेक्टर क्षेत्रात कांदा लागवड करण्यात येत होती. यावर्षी रब्बी हंगामात १३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात विक्रमी कांदा लागवड झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात कांदा लागवड झाल्यानंतर ढगाळ हवामान, धुके राहिल्याने फवारणीसह इतर भांडवली खर्च वाढला आहे.
- गणेश भोसले, तालुका कृषी अधिकारी, जुन्नर
२०२३ ते २०२६ मधील कांद्याचे प्रतिकिलोग्रॅम बाजारभाव (कृषी उत्पन्न बाजार समिती, जुन्नर)
वर्षे..... कमाल..... किमान
२०२३.......५ ............१५
२०२४.......५ .......२१
२०२५.......१० .......२७
२०२६.......३ .......१४
कांद्याचा एकरी खर्च रुपयांत
कांदा रोप.......२५,०००
लागवड पूर्व मशागत १०,०००
कांदा लागवड मजुरी : २०,०००
खते /औषधे : ५०,०००
खुरपणी..........१०, ०००
कांदा काढणी..........२०,०००
बाजार समितीत कांदा वाहतूक खर्च..........१० ते १५,०००
एकूण एकरी उत्पादन खर्च : सुमारे दीड लाख रुपये
प्रति किलोग्रॅम उत्पादन खर्च: दहा ते बारा रुपये
आजचा सरासरी प्रतिकिलोग्रॅम बाजारभाव : नऊ रुपये
कांद्याला एकरी दीड लाख रुपये खर्च झाला आहे. पिकाची सद्यःस्थिती पाहता एकरी १२ ते १३ टन उत्पादन निघणार आहे. सध्याच्या बाजारभावात भांडवली खर्च सुद्धा होतो की नाही याची चिंता आहे. केंद्र व राज्य शासनाचे कांदा उत्पादकासह शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे. पुढारी निवडणुकीत व्यस्त आहेत.
- संदीप गंभीर, कांदा उत्पादक, खामुंडी
शासकीय अनुदानाचा लाभ घेऊन २० ते २५ टन क्षमता असलेल्या सुमारे दोन हजार कांदा चाळी तालुक्यात उभारण्यात आल्या आहेत. चाळीत कांदा साठवून ठेवल्यास तीन ते चार महिन्यात वजनात ३० टक्के घट होते. शिवाय हाताळणी खर्च वाढतो. कांदा चाळीत साठवूनही मागील वर्षी बाजारभाव न मिळाल्याने मोड आलेला व सडलेला कांदा ऑगस्ट महिन्यात टाकून देण्याची वेळ आली होती.
- सचिन तोडकरी, कांदा उत्पादक, नारायणगाव
07915
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.