नारायणगाव, ता. १२ : भाविकांनी दान केलेल्या आठ मंदिरांतील दानपेट्या फोडून रोख रक्कम व मंदिरातील मौल्यवान साहित्याची चोरी करणाऱ्या सुनील सुरेश आगिवले (वय २०, रा. कळस खुर्द, ता. अकोले, जि. अहिल्यानगर), भीमा भाऊसाहेब गिऱ्हे (वय २६, रा. नांदूर शिंगोटे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) या दोन अट्टल गुन्हेगारांना कांदळी फाटा (ता. जुन्नर) येथे सापळा लावून अटक करण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पथकाला यश आले. आरोपींनी केलेले आठ गुन्हे उघडकीस आले असून, १ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.
आळे गावातील खंडोबा मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम, सोन्याच्या व चांदीचा मुलामा असलेले दागिने आदींची चोरी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी चोरट्यांनी केली होती. या प्रकरणी शांताराम भुजबळ यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली होती. याच प्रकारे मागील दोन महिन्यात जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथील श्री भैरवनाथ मंदिर, नारायणगाव येथील श्री. साईबाबा मंदिर, नळवणे गावातील श्री खंडोबा मंदिर, धालेवाडी येथील श्री शिवशंभू मंदिर, मंचर (ता. आंबेगाव) येथील कळंबा माता मंदिर, रांजणगाव गणपती गावाजवळील श्री सोमेश्वर मंदिर आदी मंदिरांमधील दानपेटी फोडून रोख रक्कम व भाविकांनी केलेले दान, तसेच मंदिरातील इतर मौल्यवान साहित्य चोरी गेले होते.
सध्या यात्रा, उत्सवाचा कालावधी असल्याने गावोगावी देव-देवीच्या यात्रा उत्सव साजरा होत आहे. याच कालावधीमध्ये मंदिरांमध्ये चोरी होत असल्याने भाविक व नागरीकांनी तीव्र नाराजी व्यक्त होती. या पार्श्वभूमीवर या गुन्ह्याचा तातडीने तपास करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दिले होते. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पोलीस पथकाने चोरी झालेल्या मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलित करून गुन्ह्याचा तपास सुरू केला होता.
दरम्यान, सापळा रचून ३ मार्च रोजी आरोपींना कांदळी फाटा येथे ताब्यात घेण्यात आले होते. पोलिस तपासात आरोपींनी पुणे जिल्ह्यातील सात व अहिल्यानगर जिल्ह्यातील एक, अशा आठ मंदिरांत चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून मोटार सायकल, कटावणी, स्क्रू डायव्हर, स्प्रे, रोख रक्कम, चांदीच्या पादुका, असा १ लाख १९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महोदव शेलार, पोलिस अंमलदार दीपक साबळे, संदिप वारे, अक्षय नवले, राजू मोमीन, विक्रम तापकीर, हेमंत विरोळे, नीलेश सुपेकर, समाधान नाईकनवरे, सुजाता कदम यांच्या पथकाने केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.