खेड शिवापूर, ता. ६ : वेळू (ता. भोर) येथे १४ वर्षीय शालेय मुलीने घरामध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
सुचिता चंद्रहास मेहर (वय १४, रा. साईकृपा बिल्डिंग, वेळू), असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. तिचे मामा शहादेव भगवान गवळी (वय ३८) यांनी याबाबत राजगड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. सुचिता हिचे कुटुंबीय व मामाचे कुटुंबीय दोघेही वेळू येथे शेजारी राहतात. सोमवारी (ता. ४) सुचिता हिची आई व वडील दोघे कामावर गेल्यावर सुचिता देखिल शाळेत गेली. शेजारी राहणारे मामा शहादेव हे पत्नी मुक्ता यांच्यासह त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांना घेऊन रिक्षाने बालाजी मंदिरात गेले होते. त्यामुळे घरी कोणीही नव्हते. सुचिता सायंकाळी सहा वाजता घरी आल्यावर तिने शेजारच्या घरातून चावी घेऊन दार उघडून तिच्या घरात गेली. त्यानंतर साडेसहा वाजता सुचिताची आई कामावरून घरी आली. त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी सुचिताला आवाज दिला, मात्र तिने दार उघडले नाही. त्यामुळे त्यांनी खिडकीमधून आत पाहिले असता सुचिता पंख्याला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. आईने आरडाओरड करून शेजारी राहणाऱ्या नागरीकांना बोलावले. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश करून सुचिताला खाली उतरवून तातडीने रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.