नसरापूर, ता. २१ ः शिंदेवाडी (ता. भोर) येथे कात्रजच्या जुन्या बोगद्याजवळ सोमवारी (ता. १८) सौरभ आठवले (वय २५, रा. पंचरत्न सोसायटी, मांगडेवाडी, पुणे) याचा खून केल्याप्रकरणी राजगड पोलिसांनी वेगात तपास करत तीन अल्पवयीनसह इतर तीन असे मिळून सहा आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासात मृत सौरभ हा प्रेमसंबधात अडचण ठरत असल्याच्या रागातून हा खून केल्याचे आरोपींनी कबूल केले आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने २८ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या खून प्रकरणी राजगड पोलिसांनी श्रीमंत अनिल गुज्जे (वय २१), संगम नामदेव क्षिरसागर (वय १९, दोघे रा. वडगाव मावळ) नितीन त्रिंबक शिंदे (वय १८, रा. गोकुळनगर, कात्रज. मुळ रा. खुठे, जि. लातूर) या तिघांना अटक केली असून इतर तीन अल्पवयीन आरोपींच्या नातेवाईकांसमक्ष गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे. गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी व तीन मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या एक अल्पवयीन आरोपी मांगडेवाडी येथे त्याच्या आत्याकडे राहत होता. त्याचे मृत सौरभ आठवले याच्या शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. या बाबत सौरभ यास माहिती मिळाल्यावर त्याने मुलीच्या घरी याबाबत सांगितले. यावरून अल्पवयीन मुलाच्या आत्याने त्याला परत वडगाव मावळ येथील घरी पाठवले, तर मुलीला शाळेत सोडण्याची व परत आणण्याची जबाबदारी मानलेला भाऊ म्हणून सौरभने घेतली. तो रोज तीला शाळेत सोडत असे व परत घरी नेत होता. सौरभमुळे आपल्या प्रेमात अडसर आला. या रागाने अल्पवयीन मुलाने इतरांच्या मदतीने या खुनाची योजना केली. सोमवारी साडेपाच वाजता सौरभ मुलीला शाळेत आणण्यासाठी गेला असता या अल्पवयीन मुलाने त्यास गाठून तुझ्याशी बोलायचे आहे म्हणून सौरभच्या दुचाकीवर बसून त्यास कात्रज जुन्या बोगद्याजवळ डोंगरातील वाटेवर आणले. त्या ठिकाणी इतर मित्रांनी येऊन सर्वांनी सौरभवर कोयत्याने वार करून खून केला.
या खून प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर व पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी चार तपास पथके तयार केली होती. यात डी. बी. पथकातील पोलिस शिपाई अक्षय नलावडे यांनी तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत असताना हा गुन्हा तीन अल्पवयीन मुलांनी व तीन इतर मुलांच्या साहाय्याने केला असल्याचे निष्पन्न झाले. हे आरोपी चतुर्मुख मंदिर गोगलवाडी येथे येणार असल्याचे समजल्यावर पोलिसांनी सापळा लावून सहाही आरोपींना ताब्यात घेतले.
या प्रकरणी पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक तुकाराम राठोड, पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील यांच्यासह राजगड पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.