नवनाथ भेके
निरगुडसर, ता. १९ : माणिकडोह बिबट निवारा केंद्रात सध्या १४० पेक्षा अधिक बिबटे आहेत. बिबट निवारा केंद्राची क्षमता ४० वरून ६० इतकी झाली असली तरी सध्या ८० पेक्षा अधिक अतिरिक्त बिबटे आहेत. ५० बिबटे वनतारा प्राणी संग्रहालयात जाण्याचा मार्ग मोकळे झाले असले तरी अजूनही त्या ५० बिबट्यांच्या स्थलांतराला मुहूर्त मिळेना.
जुन्नर वनविभागाकडून देशातील जवळपास ९० प्राणी संग्रहालयाशी बिबट नेण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला असून यातील देशातील ६ प्राणी संग्रहालयाने १५ बिबटे घेण्याबाबतची मान्यता दिली आहे. आता त्या प्राणी संग्रहालयाकडून प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव आणि सेंट्रल झू ॲथॉरिटी दिल्ली यांच्याकडून परवानगी घेण्याबाबतचा पत्र व्यवहार सुरू असून लवकरच अजून १५ बिबटे देखील देशातील ६ प्राणी संग्रहालयात जाणार आहेत. माणिकडोह केंद्रात अतिरिक्त ८० पेक्षा अधिक आहेत. हे अतिरिक्त बिबटे ज्या ठिकाणी ट्रॅप होऊन पिंजऱ्यात पकडले आहेत त्याच पिंजऱ्यात हे बिबटे माणिकडोह निवारा केंद्रात ठेवण्यात आले आहेत. बिबट निवारा केंद्राची क्षमता ६० बिबट्यांची असल्याने अतिरिक्त बिबट्यासाठी ८० पेक्षा अधिक पिंजरे गुंतून पडले आहेत.
बिबट्यासाठी दररोज चिकनवर ५० हजारांपेक्षा अधिक खर्च
माणिकडोह बिबट निवारण केंद्रातील १४० पेक्षा अधिक असलेल्या बिबट्यांना खाद्यापोटी दररोज चिकन देण्यात येते. बिबट्यांना रोज दोन किलो चिकन दिले जात असून त्यातून आठवड्यातून दोन दिवस ब्रेक असतो यामुळे बिबट्यांच्या खाद्यापोटी जवळपास दररोज ५० हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च सरकार करीत आहे.
बिबट मादीच्या नसबंदीला गती मिळणार का?
जुन्नर वनविभागातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यांत बिबट्यांची संख्या खूप वेगाने वाढत आहे, यामुळे बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटनाही वाढल्या आहेत. गेल्या २५ वर्षांत ५६ जणांचा मृत्यू झाला असून अलीकडच्या ७ वर्षांत यातील २७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बिबट्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने बिबट मादीचे नसबंदी करण्याचा निर्णय घेतला खरा; परंतु ही प्रक्रिया कधी ,किती वेगाने पूर्ण होईल माहीत नाही. ही प्रक्रिया जलदगतीने पूर्ण झाली नाही तर बिबट्यांची संख्या दुप्पट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी गुजरात येथील वनतारा प्राणी संग्रहालयास माणिकडोह बिबट निवारा केंद्रातील बिबटे घेण्याबाबत विनंती केली होती, त्यानुसार वनतारा प्राणी संग्रहालयाने सकारात्मक भूमिका घेऊन याबाबत मान्यता दिली तसेच गुजरात प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांची देखील मान्यता मिळाली आहे.
माणिकडोह बिबट निवारा केंद्रातील ५० बिबटे वनतारा प्राणी संग्रहालयात घेण्याबाबत कुठलीही अडचण राहिली नाही. वनतारा प्राणी संग्रहालयाच्या तांत्रिक टीमने या ठिकाणी येऊन वेळोवेळी भेट दिली आहे. पुढील काही दिवसांत हे बिबटे गुजरातला जाणार आहेत. माणिकडोह बिबट निवारा केंद्रातील बिबटे घेण्याबाबत देशातील ९० प्राणी संग्रहालयाशी प्रत्यक्ष बोलून व पत्रव्यवहार करण्यात आले आहेत त्यातील ६ प्राणी संग्रहालयाकडून १५ बिबटे घेण्याबाबत मान्यता मिळाली आहे. अजूनही बाकी ठिकाणाकडून सकारात्मक बोलली सुरू आहेत. बिबट्यांपासून संरक्षणासाठी असलेल्या यंत्रणांची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून ही यंत्र सामग्री देखील लवकरच मिळणार आहे.
- प्रशांत खाडे, वनउपसंरक्षक, जुन्नर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.