नीरा नरसिंहपूर, ता. १२ : बावडा (ता. इंदापूर) ग्रामीण रुग्णालय १० वर्षापासून नावालाच चालू आहे. डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या वेतनावर कोट्यवधी रुपये खर्चूनही अंतर व बाह्य रुग्णांना आरोग्य सेवा मिळत नाही. आरोग्य व सार्वजनिक बांधकाम विभागाने रुग्णालयातील आरोग्य सेवेचा खेळखंडोबा केला असून, त्वरित सुधार व कडक उपाययोजनेसाठी धरणे आंदोलनाचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष विशाल सुधाकर कांबळे व सामाजिक कार्यकर्ते अनिल विनायक कांबळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे दिला होता. दरम्यान, वैद्यकीय अधीक्षकांनी रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे पत्राद्वारे कळविल्याने धरणे आंदोलन स्थगित केले आहे.
बावडा ग्रामीण रूग्णालयात डॉक्टर व कर्मचारी मिळून २५ जणांचा स्टाफच्या वेतनावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही डॉक्टर व कर्मचारी कधी तरी व मोजकेच दिसतात. नियमित चार्ज असणारे डॉ. खानावरे रुग्णांना म्हणावी तशी सेवा व तपासणी करताना दिसत नाहीत. डॉक्टरांप्रमाणेच कर्मचारीही पगारी दांड्या मारतात. ग्रामीण रुग्णालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला सात वर्षांत दुरुस्त्या करिता ३७ स्मरणपत्रे दिली आहेत. त्यामध्ये एक्स- रे मशिनसाठी क्ष- किरण खोली, मुख्य इमारतीची छत गळतीची दुरुस्ती, ऑक्सिजन प्लॅंटचे काम दुरुस्ती, शौचालय, ऑपरेशन खोली व बाकडे, चौकटी, दरवाजे वाळव्यांनी खाल्ले आहेत. त्याऐवजी लोखंडी खिडक्या व दरवाजे बसवून रुग्णालयाचा रीतसर ताबा द्यावा. अन्यथा रूग्णालय सुरू करणे शक्य नाही, असे म्हटले आहे. सन २०१७ - १८ मध्ये रुग्णालयाच्या दोन्ही फेजमधील इमारतींचे बांधकाम मंजूर नकाशाप्रमाणे झाले असून, त्यात आणखी सुधारणा करणे शक्य नाही. आरोग्य विभागाने सुचवलेल्या दुरुस्त्या अंदाजपत्रकाच्या बाहेर असून, आम्ही एकतर्फी दिलेला ताबा न स्वीकारल्याने व बरेच वर्षे रुग्णालय चालू न केल्याने झालेली मोडतोड अंदाजपत्रकानुरूप दुरुस्त्या कराव्या लागतील, असे बांधकाम विभागाने कळविले आहे.ग्रामीण रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील रुग्णांना ऑक्सिजन पुरविणारा कोट्यवधी रुपयांचा प्लांट बंद आहे. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रसूती शस्त्रक्रिया सुविधा, संसर्गजन्य साथीच्या डेंगी, मलेरिया, निमोनिया आदी गंभीर आजारावरील उपचार बावडा परिसरातील गोरगरीब जनतेला सात वर्षापासून दोन्ही विभागांच्या चालढकलीमुळे वंचित ठेवण्यात आले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी रुग्णालयातील बांधकामाच्या त्रुटी व अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी अंदाजपत्रके सादर करून पत्र व्यवहार केलेला आहे. तसेच विद्युत जोडसाठी इंदापूर महावितरणकडे पाठपुरावा केला. त्यावर सुरक्षा ठेव जमा केल्यानंतर कनेक्शन जोडण्याचे पत्रान्वये कळविले आहे. त्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे अनुदान मागणी केली आहे, असे आंदोलनकर्त्यांना कळवले आहे.
-डॉ. नामपल्ली, वैद्यकीय अधीक्षक, बावडा ग्रामीण रुग्णालय
05128
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.