नीरा नरसिंहपूर, ता. १८ ः मागील आठवडाभरापासून कडाक्याची थंडी वाढल्याने ऊसतोड मजुरांचे कामकाज मोठ्या प्रमाणात विस्कळित झाले आहे. पहाटेच्या वेळी दाट धुके, थंड वारे आणि तापमानात झालेली अचानक घसरण, यामुळे मजुरांना वेळेवर तोडणीसाठी हजेरी लावणे अवघड झाले आहे. परिणामी कारखान्याला ऊस पुरवठ्याचाही वेग मंदावला आहे.
सकाळी सहा ते आठ या वेळेत तापमान किमान स्तरावर पोहचत असल्याने मजुरांना हातपाय गारठणे, अंग थरथरणे, श्वासोच्छवासास त्रास अशा तक्रारी जाणवत आहेत. थंडीमुळे उसावर दवबिंदू साचत असल्याने ऊस कापणीला अतिरिक्त वेळ लागत आहे. दरम्यान, कापलेल्या उसावर पाण्याचे प्रमाण वाढल्याने वजनात होणारे बदल आणि वाहतुकीचा वेग मंदावणे, अशाही अडचणी निर्माण होत आहेत.
थंडीचा फटका फक्त ऊस तोडणीपुरता मर्यादित नसून, ग्रामीण भागातील बांधकामे, शेतीची कामे, सकाळची बाजारपेठ, दूध संकलन, तसेच विद्यार्थ्यांची शाळेकडे जाण्याची वेळ या सर्वांवरच परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे.
आरोग्य विभागाने नागरिकांना सकाळच्या वेळेत थंडीपासून बचाव करण्याचे आवाहन केले असून, गरजेनुसार गरम कपडे, मफलर, हेडकव्हर वापरण्याचे आवर्जून सांगितले आहे. थंडीच्या लाटेचा प्रभाव आणखी काही दिवस राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
05211