ओतूर, ता. २३ : पिंपळगाव जोगा (ता. जुन्नर) धरणाच्या कालव्याची ठिकठिकाणी दुरवस्था झाली असून सिमेंट काँक्रीट उखडले आहे तसेच झाडेझुडपे ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. धरणातून कालव्याला आवर्तन सोडण्याआधीच कुकडी पाटबंधारे विभागाने पाहणी करून संभाव्य पाणी गळती थांबवण्यासाठी उपाय योजना करावी, अशी मागणी कालव्याच्या बाजूच्या शेतकऱ्यांकडून होत आहे.
पिंपळगाव जोगा कालव्यातून पाण्याचे आवर्तन सोडण्याआधी कालव्यातील उखडलेले सिमेंट काँक्रिटीकरण परत करावे तसेच झाडे झुडपे व अडथळे काढून पाणी गळती रोखावी, अशी मागणी पिंपळगाव जोगा, डिंगोरे, उदापूर, ओतूर, खामुंडी, डुंबरवाडी, गायमुखवाडी, पिपरीपेंढार, वडगाव आनंद व आळेफाटा व अन्य गावांच्या कालव्या लगतच्या शेतकऱ्यांनी केली आहे. दरवर्षी पिंपळगाव जोगा धरणातून जुन्नर तालुक्यातील पूर्व भागासाठी तसेच नगर जिल्ह्यासाठी कालव्याद्वारे पाण्याचे आवर्तन सोडण्यात येते; मात्र त्यातील लाखो लिटर पाणी कालव्याच्या दुरवस्थेमुळे व गळतीमुळे वाया जाते. तसेच त्याचा मोठा त्रास कालव्याशेजारी शेतीला व घरांना होतो. त्यामुळे धरणातून कालव्यात पाण्याचे आवर्तन सोडण्याआधीच कुकडी पाटबंधारे विभागाने पिंपळगाव जोगा कालव्याची पूर्ण पाहणी करून कलव्याची उखडलेले सिमेंट काँक्रीट व उगवलेली झाडेझुडपे काढावी तसेच ज्या भागात कालवा फुटायची शक्यता आहे. डागडुजी करावी आणि प्रत्येक आवर्तनाला होणारी लाखो लिटर पाण्याची गळती थांबवावी, अशी मागणी कालव्याच्या दुतर्फा शेती असणाऱ्या शेतकऱ्यांकडून होत आहे.
...अन्यथा कालवा फुटू शकतो
पिंपळगाव जोगा कालव्याचे डिंगोरे, उदापूर व ओतूर गावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रिटीकरण उखडले आहे. या आधी कालवा फुटीच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे संबंधित कुकडी पाटबंधारे विभागाने पाहणी करून मोठ्या प्रमाणात डागडुजी करावी , अन्यथा कालव्याला आवर्तन सुरू झाल्यावर कालवा फुटू शकतो.
01597