पाबळ, ता. ३० : पाबळ (ता. शिरूर) हे केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेले आणि दुष्काळाने ग्रासलेले गाव. पण येथेच जिद्दीने यश मिळवणारे दोन तरुण घडले. प्रवीण काळुराम गव्हाणे आणि प्रमोद दगडू तांबे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करत पोलिस उपनिरीक्षक पदावर आपली मोहोर उमटवली.
प्रवीण गव्हाणे यांनी प्राथमिक शिक्षण थापेवाडी (पाबळ) येथील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण भैरवनाथ विद्यामंदिर पाबळ येथे घेतले. उच्च माध्यमिक शिक्षण विद्याधाम प्रशाला, शिरूर येथे पूर्ण करून आयएसबीएम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून अभियांत्रिकीची पदवी संपादन केली.
प्रमोद तांबे यांनी झोडकवाडी (पाबळ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून शिक्षणाची सुरुवात केली. माध्यमिक शिक्षण भैरवनाथ विद्यामंदिर पाबळ येथे पूर्ण करून, जी. एस. मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.
प्रवीण आणि प्रमोद हे बालपणापासूनचे जिवलग मित्र. खाकी वर्दीचे आकर्षण असल्याने दोघांनी ही पोलिस दलात अधिकारी होण्याचे स्वप्न लहानपणापासूनच उराशी बाळगले होते. स्पर्धा परीक्षेचा एकत्र अभ्यास करताना अनेकदा यशाने हुलकावणी दिली, एक-दोन गुणांमुळे संधी हुकली. पण त्यांनी हार मानली नाही. लॉकडाऊनच्या कठीण काळातही सातत्याने अभ्यास करून अखेर आपले ध्येय साध्य केले.
त्यांच्या या मेहनतीचे आणि यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पाबळ ग्रामस्थांनी भव्य सत्कार समारंभ आयोजित करून त्यांचा सन्मान केला. या यशस्वी तरुणांनी पाबळच्या मातीतून मेहनतीचा आदर्श निर्माण केला असून, नव्या पिढीला हा प्रेरणा देईल असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
संघर्ष आणि सातत्याच्या जोरावर हे यश मिळवता आले. कुटुंब, मार्गदर्शक आणि मित्रांचा आधार हीच खरी ताकद ठरली. आमचे बंधू वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी मला मोलाचे मार्गदर्शन केले. सर्वांच्या सहकार्यामुळे हे यश मिळाले आहे. आता खाकी वर्दी परिधान करून जनतेची सेवा करायला उत्सुक आहे.
- प्रवीण गव्हाणे, पोलिस उपनिरीक्षक
खाकी वर्दीचे स्वप्न आज प्रत्यक्षात साकार झाले, हा क्षण अविस्मरणीय आहे. अभ्यास करताना अनेकदा अपयश आले, अडथळे आले, पण जिद्द आणि मेहनतीने पुढे जात राहिलो. कुटुंब, गुरुजन आणि मित्रांचा आधार हा यशाचा खरा मंत्र ठरला. आता लोकसेवेसाठी स्वतःला समर्पित करणार आहे.
- प्रमोद तांबे, पोलिस उपनिरीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.