सागर रोकडे : सकाळ वृत्तसेवा
कवठे येमाई, ता. २० : कवठे येमाई (ता. शिरूर) येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत मोडकळीस आली आहे. येथील सर्वच पदे रिक्त असल्याने दवाखाना बहुतांश वेळा बंदच असतो. या दवाखान्याअंतर्गत कवठे येमाई, मुंजाळवाडी, सविंदणे या गावांचा समावेश होतो. रिक्त पदे व अपुऱ्या सोयी सुविधा यांमुळे उपचारासाठी पशुधन घेऊन येणाऱ्या पशुपालकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
कान्हूर मेसाई येथील मूळ पदभार असलेले पशुधन पर्यवेक्षक अनिल सूर्यवंशी हे येथील अतिरिक्त कामकाज सांभाळत आहेत. त्यांच्याकडे तीन दवाखान्यांचा पदभार असून त्यांच्या अखत्यारीत तब्बल १३ गावे आहेत. त्यांना मदतीला पुरेसे मनुष्यबळ नसल्याने नियमित सेवा देणे शक्य होत नाही.
दरम्यान, वैरण बियाणे वितरणासाठी ५० अर्ज प्राप्त झाले आहेत.
समस्यांच्या विळख्यात इमारत
- छताची गळती
- दरवाजे-खिडक्यांची मोडतोड
- भिंतींना गेलेले तडे
- परिसरातील अस्वच्छता
- उपकरणांची कमतरता
- स्वच्छतागृहाचा अभाव
- वीज आणि पाण्याचा तुटवडा
पशुपालकांच्या सेवेत घट
पशुधन पर्यवेक्षक सूर्यवंशी हे खासगी कर्मचाऱ्यांच्या मदतीने कामकाज करत आहेत. मात्र अपुऱ्या सुविधांमुळे पशुपालकांना आवश्यक उपचार मिळत नसल्याने त्यांची धावपळ वाढली आहे. त्यांना खासगी उपचार करावे लागत आहे. परिणामी दवाखान्यात येणाऱ्या पशुपालकांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. दवाखान्यात मूलभूत सुविधा व मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी स्थानिक पशुपालकांनी केली आहे.
यांची आहे गरज
- पशूधन विकास अधिकारी, पर्यवेक्षक व परिचर
- नवीन इमारत व साधनसामग्री
- नवीन इमारतीस संरक्षण भिंत
- एक्सरे व सोनोग्राफी सुविधा
- पुरेसा व प्रशिक्षित कर्मचारी व अद्ययावत सामग्री
- पाण्याची टाकी, स्वच्छता गृह व परिसर स्वच्छता
दृष्टिक्षेपातील स्थिती
- मोडकळीस आलेली दवाखान्याची इमारत
- दवाखाना बहुतांश वेळा बंदच
- दवाखान्यात व परिसरात अस्वच्छता
परिसरातील पशुधन
गाई ..........५३८७
म्हशी..........३०६
मेंढी..........२७९४
शेळी..........९६६
एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ ची स्थिती
कृत्रिम रेतन संख्या..........६२
वंध्यत्व निर्मूलन संख्या........२२०
गर्भधारणा तपासणी....२८७
-------------------------------------
लसीकरण
लाळ्या खुरकूत ..........५२३६
लंपी.......... ५५००
पीपीआर/इटी (मेंढी व शेळी)..........१८५०
रेबीज..........२०
घटसर्प...१८००
फऱ्या...२००
परिसरात आढळणारे प्रमुख पशुरोग
लंपी..........३०
- चारा उत्पादन क्षेत्र.....१३४५ हेक्टर
- गावातील सिंचित ओलिताखाली.... क्षेत्र ९४७ हेक्टर
वार्षिक चारा (टनांत)
हिरवा.....१२४
वाळलेला.....१८१०
दवाखान्यातील रिक्त पदे
पशुधन विकास अधिकारी..........१
सहाय्यक पशुधन विकास अधिकारी/ पशुधन पर्यवेक्षक..........१
परिचर..........१
कवठे येमाई येथील दवाखान्याची इमारत साधारण १९९० ची आहे. तिची दुरवस्था झाल्याने नवीन इमारत मंजुरीसाठी पत्रव्यवहार केला असून पाठपुरावा सुरू आहे. येथील पशुधन विकास अधिकारी, पर्यवेक्षक व परिचर पद रिक्त असल्याने कान्हूर मेसाई येथील पशुधन पर्यवेक्षक अनिल सूर्यवंशी यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी दिली आहे. त्यांच्या माध्यमातून प्राप्त स्थितीनुसार दर्जेदार सेवा पुरविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- डॉ. नितीन पवार, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग
कवठे येमाई येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत मोडकळीस आली असल्याने त्या ठिकाणी नवीन इमारत उभारण्याची गरज आहे. तसेच परिसरात पशुधनाची संख्या जास्त असल्याने येथील सर्व रिक्त पदे तातडीने भरण्याची व साधन सामग्री उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून पशुपालकांना खासगी उपचारासाठी जादा शुल्क मोजावे लागणार नाही. व पशुपालकांना दर्जेदार सुविधा मिळण्यास मदत होईल.
- राजेंद्र सांडभोर, शेतकरी, कवठे येमाई
01576
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.