शिरूर, ता. ३ : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामकाजातून वगळण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला असताना, शिरूर तालुक्यात मात्र या निर्णयाची अंमलबजावणी अर्धवट होत असल्याचे चित्र आहे. मतदानाच्या दिवशी शनिवारी (ता. ७) परीक्षा असलेल्या शिक्षकांनाच निवडणूक कामकाजातून वगळण्यात येणार असून, रविवारी (ता. ८) सकाळी परीक्षा असलेल्या शिक्षकांना मात्र कामकाजावर हजर राहण्याचे लेखी आदेश निवडणूक अधिकारी विठ्ठल जोशी यांनी काढले आहेत. यामुळे शिरूर तालुक्यातील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह शिक्षकांचीही निवडणूक कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या सेवेत असलेल्या व बढतीसाठी पात्र ठरणाऱ्या शिक्षकांसाठी सीटीईटी परीक्षा बंधनकारक करण्यात आली असून, ही परीक्षा ७ व ८ फेब्रुवारीला होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्ह्यांकडून अहवाल मागवून राज्य निवडणूक आयोगाने परीक्षार्थी शिक्षकांना निवडणूक कामकाजातून वगळण्याचे निर्देश दिले. मात्र शिरूर तालुक्यात निवडणूक निर्णय अधिकारी जोशी यांनी काढलेल्या आदेशानुसार केवळ मतदानाच्या दिवशी परीक्षा असलेल्या शिक्षकांनाच सूट देण्यात आली आहे. रविवारी सकाळी परीक्षा असलेल्या शिक्षकांना कामकाजावर हजर राहणे बंधनकारक करण्यात आले असून, गैरहजर राहिल्यास पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.
शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, मतदानाच्या दिवशी उशिरापर्यंत निवडणूक कामकाज केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी परीक्षा केंद्रावर वेळेत हजर राहणे अनेकांसाठी अशक्य आहे. आंबेगावसह इतर तालुक्यांमध्ये मात्र दोन्ही दिवशी परीक्षा असलेल्या शिक्षकांना कामकाजातून वगळण्यात आले आहे. शिरूरमध्येच निवडणूक अधिकारी यांनी वेगळी भूमिका घेतल्याने शेकडो शिक्षकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
निवडणूक कामकाजासाठी खासगी शाळेच्या शिक्षकांची नेमणूक करूनही मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे ज्या शिक्षकांची परिक्षा मतदानाच्या दिवशी शनिवारी (ता. ७) आहे अशा व दुसऱ्या दिवशी रविवारी जिल्ह्याबाहेर परिक्षा आहे अशा १६० जणांना कामकाजातून वगळण्यात आले आहे. परंतु ज्यांची परिक्षा रविवारी (ता. ८) पुणे जिल्ह्यात आहे. त्यांना अपुरे मनुष्यबळ असल्याने कामकाजातून वगळणे शक्य होणार नाही. त्यांना मतदानाच्या दिवशी सायंकाळी सहा वाजता मतदान केंद्रावरून कार्यमुक्त करण्यात येईल.
-विठ्ठल जोशी, निवडणूक निर्णय अधिकारी, शिरूर
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा असलेल्या परीक्षार्थी शिक्षकांना कामकाजातून वगळण्याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. मात्र शिरूर येथील निवडणूक अधिकारी यांनी केवळ मतदानाच्या दिवशी परिक्षा असलेल्या शिक्षकांनाच वगळले असून दुसऱ्या दिवशी सकाळी परिक्षा असलेल्या शिक्षकांना कामकाजावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. रविवारी सकाळी लवकर परिक्षा केंद्रावर हजर राहणे सर्वांना शक्य होणार नाही. त्यामुळे शेकडो शिक्षकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे सर्व परीक्षार्थी शिक्षकांना कामकाजातून सरसकट वगळण्यात यावे. याबाबत आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे ईमेल द्वारे विनंती केली आहे.
-एक परीक्षार्थी शिक्षक, शिरूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.