कवठे येमाई, ता. २५ : सविंदणे (ता. शिरूर) येथील शिक्षकाला सुमारे बारा जणांच्या टोळक्याने घरातून उचलून नेत लाथाबुक्क्या व काठ्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (ता. २४) सायंकाळी घडली. घटनेच्या निषेधार्थ सविंदणे येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी बुधवारी (ता. २५) ठिय्या आंदोलन करीत पोलिसांकडे शिक्षकाला न्याय देण्याची मागणी केली.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सविंदणे येथील क्रीडा शिक्षक नितीन चव्हाण हे घरात झोपले असताना त्यांना टोळक्याने घरातून उचलून नेले व भरचौकात बेदम मारहाण केली. टोळक्यातील काहीजणांकडे काठ्या, दांडके तसेच कोयता असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत ठिय्या आंदोलन केले. ‘जोपर्यंत आमच्या शिक्षकांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही’, असा ठाम पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला. ‘आमच्या शिक्षकांना न्याय द्या’ अशा आशयाचे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. आंदोलनात पालकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच टाकळी हाजी पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस अंमलदार अरुण उबाळे व शंकर बल्लाळ हे घटनास्थळी दाखल झाले. विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या वाहनालाही घेराव घालत घटनेचा तीव्र निषेध नोंदविला. जोपर्यंत आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला. दरम्यान, शिरूरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे आणखी पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांशी संवाद साधत घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यानंतर तब्बल चार तासांनी आंदोलन स्थगित केले. या घटनेमुळे सविंदणे व परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, बुधवारी (ता. २५) रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
01780
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.