पाबळ, ता. २९ : सर्जा-राजाच्या गळ्यात मंजुळ नाद करणाऱ्या घुंगरांच्या माळा, अंगावर रंगबेरंगी नक्षीदार झूल, शिंगांना लावलेले उठावदार रंग आणि कपाळावर हळदीकुंकवाचा टिळ... असा देखणा साज चढवलेल्या बैलजोड्यांच्या गाड्या जुंपून खंडेरायाच्या दर्शनासाठी जाण्याची परंपरा आजही ओतूर (ता. जुन्नर) परिसरात पहावयास मिळते आहे. रविवारी (ता. २९) या गाड्यांचे आगमन पाबळ येथे झाले.
सजवलेल्या बैलगाड्यांचे स्वागत ग्रामस्थांनी केले. दुपारच्या सुमारास परिसरातील झाडांच्या सावलीत काहीशी विश्रांती घेतल्यानंतर भाविकांनी जेजुरीच्या दिशेने प्रस्थान केल्याचे खंडू राघू बनकर, बबन काशिनाथ अहिनवे यांनी सांगितले.
या प्रवासासाठी बैलांसाठी वैरण, स्वयंपाकाचे साहित्य, बिछाना तसेच पिण्याच्या पाण्याचा टँकर अशी सर्व तयारी सोबत केली जाते. प्रवासादरम्यान सजवलेल्या बैलजोड्या रस्त्यावरून जाताना नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या.
ओतूरहून निघाल्यानंतर नारायणगाव मार्गे थापलिंग येथे खंडेरायाचे दर्शन घेऊन पहिला मुक्काम केला जातो. त्यानंतर पहाटे उठून लोणी-धामणी, पाबळ मार्गे जातेगाव मुखई येथे दुसरा मुक्काम होतो. पुढे शिंदवणे घाट पार करत जेजुरी येथे पौर्णिमेच्या आदल्या दिवशी पोहचत मुक्काम केला जातो. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी गोड पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून, तळी भंडारा व खोबऱ्याची उधळण करत खंडेरायाचे मनोभावे दर्शन घेतल्यानंतर भाविक परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात. सुमारे नऊ दिवस ही यात्रा सुरू असते.