पाईट, ता. ११ ः पाईट (ता. खेड) येथील श्रीनवखंडेनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त भरलेल्या कुस्त्याच्या आखाड्यात आंतरराष्ट्रीय मल्लांनी मैदान गाजवत शेवटपर्यंत उत्कंठावर्धक खेळी केली. कार्यक्रमात पाईट ग्रामस्थ व मंत्रालय आयुक्त श्रीधर डुबे, मंत्रालय जिल्हाधिकारी दिगंबर रौंधळ, तहसीलदार मयूर खेंगले, पुणे शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे आदी उपस्थित होते.
स्पर्धेत प्रथम क्रमांक एक लाख ५१ हजार तसेच नवखंडेनाथ केसरीचा किताब, मानाची गदा यावर पुणे येथील काका पवार तालमीच्या शुभम मुसळे याने आपले नाव कोरले. मुसळे याने बेनापूर सांगलीच्या अण्णा यमगरवर पॉइंटने मात केली. तसेच एक लाख एक हजार रुपयांची दुसरी कुस्ती बेनापूर सांगलीचा आंतरराष्ट्रीय खेळाडू नाथा पवार विरुद्ध सह्याद्री तालीम-पुणे येथील आकाश माने यांच्यात बरोबरीने सुटली. तिसऱ्या क्रमांकाची रुपये ७५ हजारांची कुस्ती पुणे येथील महाबली केसरी ओंकार एलभर विरुद्ध सातारा येथील रोहन गावडे यांच्यामध्ये समान निर्णय होऊन कुस्ती पार पडली.
चौथ्या क्रमांकाची रुपये ७५ हजारांची कुस्ती भोसरीच्या अक्षय पवार विरुद्ध काका तालीम पुण्याचा श्रेयस कारले यांच्यात लक्षवेधी ठरली. यामध्ये अक्षय पवारने बाजी मारली. पाचव्या क्रमांकाची रुपये ७५ हजारांची कुस्ती पुणे येथील काका पवार तालमीच्या आदेश डुबे विरुद्ध पारनेरच्या भरत फुलमाळी यांच्यात बरोबरीत पार पडली. ही कुस्ती स्पर्धेत अनेक जिल्ह्यांतील नामांकित व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुमारे ९० मल्लांनी सहभाग नोंदवला. यामध्ये नामांकित मल्लांच्या सुमारे ३२ कुस्त्या निकाली पार पडल्या. यासाठी एकूण इनाम १० लाख रुपये असल्याचे समस्त ग्रामस्थ व यात्रा कमिटीने सांगितले. ही कुस्ती स्पर्धा दुपारी चार वाजता सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत पाईट येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात पार पडल्या.
उत्सवात पहिल्या दिवशी श्रींची महापूजा, हारतुरे, शेरणीवाटप, पालखी मिरवणूक व छबिना तसेच सलग दोन दिवस बैलगाडा शर्यत, रात्रीच्या वेळी लोकनाट्य, ऑर्केस्ट्रा व इतर करमणुकीचे कार्यक्रम, तिसऱ्या दिवशी कुस्ती आखाड्याचे आयोजन व ग्रामस्थांच्या दण्डवतांचा कार्यक्रम पार पडला.
पाईट पोलिसांनी बंदोबस्त चोख ठेवला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.