पुणे, ता. ८ : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने (पीडीसीसी) चालू वर्षीच्या खरीप हंगामासाठी एकाच महिन्यात १ हजार ३०१ कोटी १४ लाख ५४ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यातील कर्ज वाटपाचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ६८.८४ टक्के इतके पूर्ण झाले आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार २७७ शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ मिळाला आहे. दरम्यान, खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना येत्या ३० सप्टेंबरपर्यंत पीक कर्ज घेता येणार आहे. आगामी खरीप हंगामासाठी १ एप्रिल २०२३ पासूनच पीक कर्ज वाटप सुरु केल्याचे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सोमवारी (ता. ८) सांगितले.
पुणे जिल्हा बॅंकेच्यावतीने मागील पंधरा वर्षापासून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजाने वितरित केले जात आहे. त्यानंतर सातारा जिल्हा बॅंकेनेही पुणे जिल्हा बॅंकेच्या पावलावर पाऊल ठेवत, हाच उपक्रम मागील दहा वर्षांपासून सुरु केला आहे. पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यात शून्य टक्के व्याजाचा हा प्रयोग यशस्वी झाल्याचे पाहून राज्य सरकारने राज्यभर कर्ज वाटपाचा हा ‘पॅटर्न’ सुरू केला होता. परंतु, दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने या पीक कर्जासाठीची दोन टक्के व्याज सवलत कमी केला. त्यामुळे मध्यंतरी याबाबत पेच निर्माण झाला होता. परिणामी शून्य टक्के व्याजाची ही योजनाच बंद पडण्याच्या मार्गावर आली होती. परंतु, राज्य सरकारने अर्धा टक्के व्याजाचा फरकाचा भार राज्य बॅँकेने उचलावा, अशी सूचना राज्य बॅँकेला केली होती. परंतु, राज्य बॅँकेने काही जाचक अटी घातल्याने सरकारची ही सूचना बारगळली होती. मात्र, अर्धा टक्के व्याजाच्या फरकाचा भार स्वतः जिल्हा बॅँकच उचलणार आहे. त्यामुळे यापुढेही शून्य टक्के व्याजाची सवलत चालू राहणार आहे.
मागेल त्याला लाभ
जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांसाठी जिल्हा बॅंकेने यंदा १ हजार ८९० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यानुसार जिल्ह्यातील मागेल त्या पात्र शेतकऱ्यांना या पीक कर्जाचा लाभ दिला जाणार आहे. शिवाय यावर्षीही तीन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जासाठी शून्य टक्के व्याजाची योजना चालू ठेवण्यात आली आहे.
जिल्ह्यातील खरीप पीक कर्ज दृष्टीक्षेपात
खरिपासाठी पीक कर्ज वाटपाचे एकूण उद्दिष्ट- १ हजार ९०० कोटी रुपये
आतापर्यंत प्रत्यक्षात पूर्ण झालेले वाटप- १ हजार ३०१ कोटी १४ लाख ५४ हजार रुपये
पीक कर्जाचा लाभ घेतलेले एकूण शेतकरी- १ लाख ४२ हजार २७७
पीक कर्जाचा लाभ झालेले क्षेत्र- १ लाख १९ हजार ९९५ हेक्टर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.