पिंपरी, ता. ३० : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी ‘ए-बी’ फॉर्मसाठी इच्छुकांना झुलवत ठेवले. ‘महायुती’ व ‘महाविकास आघाडी’ होईल, या शक्यतेवर अनेक जण थांबून होते. मात्र, शेवटच्या काही मिनिटांत भाजप-शिवसेनेची युती फुटली. तर, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने महाविकास आघाडीही तुटली. त्यातील दोन पक्षांनी एकत्र येत दोन नवीन सहकाऱ्यांसमवेत स्वतंत्र आघाडी केली आहे. त्यामुळे शहरात चौरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले असून, खऱ्या लढती अर्ज माघारीनंतरच स्पष्ट होतील.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ डिसेंबर रोजी जाहीर केले होते. त्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुजोरा दिला होता. त्यांचे मित्रपक्ष शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले) हे भाजपसोबत महायुती म्हणून लढतील, अशी चर्चा होती. त्यासाठी वरिष्ठ पातळीवरूनही प्रयत्न सुरू होते. मात्र, जागा वाटपावरून भाजप-शिवसनेचे मंगळवारी (ता. ३०) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही मिनिटांपूर्वी बिनसले. त्यामुळे तीन जागांवर समाधान मानत रिपाइंने (आठवले) भाजपची साथ दिली आहे. शिवसेना स्वतंत्र लढणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र लढणार आहेत. त्यामुळे महविकास आघाडीही तुटली आहे. यातील शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत (मनसे) आघाडी केली होती. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर होता. मनसेसोबत आघाडी होणार नाही, अशी स्थिती होती. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या काही तासांमध्ये काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) व मनसे एकत्र लढण्याचे ठरले. शिवाय, राष्ट्रीय समाज पक्षालाही त्यांनी सोबत घेतले आहे. त्यांच्या जागा वाटपाचाही फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये ‘महायुती’ आणि ‘महाविकास आघाडी’ व्यतिरिक्त वेगळी समीकरणे बघायला मिळणार आहेत. वंचित बहुजन आघाडीने काँग्रेससोबत जाण्यास विरोध दर्शविला आहे. त्यामुळे ते स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले.
यादी नाही; थेट ‘ए-बी’
बंडखोरी टाळण्यासाठी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसने इच्छुक उमेदवारांची यादी जाहीर करण्याचे टाळले. मात्र, काहींना थेट निरोप देऊन उमेदवारी अर्ज दाखल करायला लावले. त्यानुसार काहींनी सोमवारी (ता. २९) तर काहींना शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता. ३०) उमेदवार अर्ज दाखल केले. त्यांनी ‘ए-बी फॉर्म’ दाखल केले नव्हते. मंगळवारी शेवटच्या एक तासांत सर्वांना ‘ए-बी फॉर्म’ देण्यात आले. त्यामुळे सर्वांचीच धावपळ उडाली. हाच कित्ता दोन्ही शिवसेना, काँग्रेस, मनसे या पक्षांनीही राबवला.
असे आहे १२८ जागांचे वाटप
युती
भाजप : १२३
रिपाइं : ५
आघाडी-१
राष्ट्रवादी (अजित पवार) : १२०
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) : ८
आघाडी-२
काँग्रेस : ३५
शिवसेना (ठाकरे) : ७१
मनसे : १९
रासप : ३
स्वतंत्र
शिवसेना : १२८
----