चिखली : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी (ता.३०) शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमधील बहुतांश इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात जाऊन दाखल केले. मात्र, अनेक इच्छुकांना राजकीय पक्षांकडून ए-बी फॉर्म न मिळाल्याने नाराजी व्यक्त करीत अपक्ष अर्ज दाखल केले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
महापालिका प्रभाग क्रमांक एक चिखली पाटीलनगर- साने चौक- म्हेत्रे मधील राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांनी उमेदवारांनी प्रभाग परिसरामध्ये प्रथम शक्तिप्रदर्शन केले. त्यानंतर अर्ज दाखल करण्यासाठी चिखली घरकुल येथील टाऊन हॉलमध्ये असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केले. प्रभाग क्रमांक ११ मधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून इच्छुक असलेल्या महिलांना त्यांच्या पक्षांनी तिकीट न दिल्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केलेत. अनेक उमेदवारांनी सोमवारीच अर्ज दाखल केले होती. मात्र, एक अर्ज बाद झाला तर सुरक्षितता व खबरदारी म्हणून दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सुद्धा अर्ज दाखल केले. सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अर्ज भरण्यासाठी उमेदवारांच्या आणि सूचक, अनुमोदक यांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या. यावेळी प्रमुख पक्षाच्या उमेदवारांची मोठी धावपळ उडाली.
अर्जांची काटेकोर तपासणी
प्रत्येक उमेदवार अर्जाची काटेकोरपणे तपासणी करून घेत होते. घरात शौचालय असल्याचा दाखला, खर्चाचा तपशील तसेच इतर कागदपत्रांची पूर्तता करताना अनेक उमेदवारांची धावपळ उडाली होती. उमेदवारांनी एक-दुसऱ्याच्या विरोधात कोणतेही आक्षेप न नोंदवल्याने उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम शांततेत पार पडला. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून उमेदवार आणि त्याच्याबरोबर दोनच लोकांना आत जाण्याची परवानगी दिली.