राजगुरूनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीतील पक्षच एकमेकांविरुद्ध लढायला सिद्ध झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना अशी तीनही पक्षांनी आपापली पॅनेल्स उभी केली आहेत.
- राजेंद्र सांडभोर
राजगुरुनगर नगरपरिषदेमध्ये प्रथमच लोकनियुक्त नगराध्यक्ष होणार असून, नगराध्यक्षपद खुल्या गटासाठी निश्चित झाल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने पॅनेल उभे केले आहे. राजगुरुनगर सहकारी बँकेचे अनेक वर्षे संचालक असलेले आणि अनेकदा अध्यक्ष राहिलेले किरण आहेर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. भारतीय जनता पक्षाने भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल उभे केले असून माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. तर नुकताच शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पॅनेल उभे केले आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य मंगेश गुंडाळ यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली आहे. आमदार बाबाजी काळे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून माजी नगराध्यक्ष बापू थिगळे यांना रिंगणात उतरविले आहे.
सत्तेत असल्याने आम्ही यापूर्वी अनेक रस्ते, पूल, क्रीडा संकुल, हुतात्मा राजगुरू स्मारक, न्यायालयाची इमारत, पोलिस ठाण्याची इमारत अशी कामे केली. यापुढेही आम्हीच विकासाची कामे करू शकतो, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची आहे तर विकासासाठीच आम्ही शिवसेनेत गेलो आहोत, असे शिवसेनेचे लोक म्हणत आहेत. राज्यात खऱ्या अर्थाने आमची सत्ता आहे, पाणी आणि सांडपाणी योजना आम्हीच आणली त्यामुळे विकासही आम्हीच करू शकतो, असा भाजपचा दावा आहे.
प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, मतांसाठी उमेदवार नवनवीन शक्कल लढवत आहेत. हिवाळा असल्याने एका उमेदवाराने स्वेटर वाटले, तर त्यावर दुसऱ्या उमेदवाराने, ‘कुणी कितीही वाटा स्वेटर, आमचाच उमेदवार बेटर’ अशी मल्लीनाथी केली. उघडपणे साड्या वाटल्या जात आहेत, पण प्रशासनाची तपासणी पथके ढिम्म आहेत.
शहरातील प्रमुख प्रश्न
अशुद्ध आणि अपुरे पिण्याचे पाणी
इतस्ततः टाकण्यात येणारा कचरा
अनेक ठिकाणी रस्त्यांवरून वाहणारे सांडपाणी
पार्किंग नसल्याने रस्त्यांवर लावल्या जाणाऱ्या गाड्या
अनधिकृत बांधकामांचे पेव
अतिक्रमणे आणि बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
सार्वजनिक स्वच्छतागृहांची वानवा
या प्रश्नांकडे देणार लक्ष
- स्वच्छ आणि मुबलक पाणी
- करांचे दर कमी करण्याचा प्रयत्न
- सुलभतेने कार्यालयीन कारभार
- कचरा प्रकल्प
- नाना नानी पार्क, बालोद्यान
प्रचारातील मुख्य मुद्दे
- भरमसाठ करवाढ
- गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे नगरपरिषदेत अराजक
- भ्रष्टाचारामुळे योजनांची आणि विकासकामांची वाट
- वारंवार खोदाईमुळे लागलेली रस्त्यांची वाट
- नगरपरिषदेत झालेला ७२ लाखांचा घरपट्टी पाणीपट्टी घोटाळा
- अपुरा पाणीपुरवठा
- लोकांना विकत घ्यावे लागते पिण्याचे पाणी
मागील पक्षिय बलाबल (२०१५) :
नगरसेवकांची एकूण संख्या - १८
भारतीय जनता पक्ष - ७
शिवसेना - २
अपक्ष - ९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.