पुणे, ता. २४ : वाकड येथील इंदिरा नॅशनल स्कूल, हडपसरमधील छत्रभुज नरसी स्कूल, न्यू नऱ्हे येथील ब्लॉसम पब्लिक आणि कोथरूड येथील एमआयटी स्कूलने प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवून पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स क्रिकेट स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटाची पुढील फेरी गाठली.
मुंढवा येथील ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. सामनावीर अंशुमन मंडलच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर इंदिरा नॅशनलने येथील व्हिजन इंटरनॅशनलचा नऊ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंदिरा स्कूलने निर्धारित १० षटकांत २ बाद ९७ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना व्हिजनचा संघ ५ बाद ८८ धावाच करू शकला. अंशुमनने २० चेंडूंत नाबाद २५ धावा आणि १० धावांत दोन गडी बाद करून विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यानंतर झालेल्या रोमांचक लढतीत छत्रभुज नरसी स्कूलने एरंडवणे येथील अभिनव स्कूलवर अवघ्या एका धावेने विजय मिळविला. छत्रभुज नरसी स्कूलने ६९ धावा केल्यानंतर अभिनव स्कूलला ६८ धावांपर्यंतच मजल मारता आली. सिद्धार्थ मालपती हा सामनावीर ठरला. तिसऱ्या सामन्यात ब्लॉसम पब्लिकने आर्यन्स वर्ल्ड स्कूलला सात गड्यांनी नमविले. सामनावीर कौस्तुभ जांभळेचे अष्टपैलू प्रदर्शन ब्लॉसमच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. शेवटच्या सामन्यात एमआयटी स्कूलने विबग्योर स्कूलला नऊ विकेटने पराभूत केले. तीन विकेट घेणारा प्रणय ढवळे विजयाचा शिलेदार ठरला.
संक्षिप्त धावफलक
इंदिरा नॅशनल : १० षटकांत २ बाद ९७ (अंशुमन मंडल नाबाद २५, शर्विल लेले १९, अमेय चपळगावकर १९, आरव सिंग नाबाद २२, रुद्र सानप १-२४) वि. वि. व्हिजन इंटरनॅशनल : १० षटकांत ५ बाद ८८ (हर्षल काळे नाबाद २०, साईराज निचित १६, अंशुमन मंडल २-१०, अंशुमन वाघ १-१३, अमेय चपळगावकर १-७, सम्यक कांबळे १-८).
छत्रभुज नरसी : ६९ (सिद्धार्थ मालपती २४, रियान पटालिया १२, आरव उगले १-१०, क्षितिज एरंडे १-८, अभिर जोगळेकर १-९) वि. वि. अभिनव विद्यालय, एरंडवणे : ६८ (आदित्य पिसे नाबाद २०, पार्थ धोत्रे ११, अर्णव उगले १०, धीर ठाणावाला १-१२, अर्जुन गुप्ता १-१७, अगस्त्य कुलकर्णी १-७).
आर्यन्स वर्ल्ड : ८१ (सिद्धेश नाईक ३३, सिद्धांत एडके १२, ओम गायकवाड २-१२, कौस्तुभ जांभळे २-२१) पराभूत वि. ब्लॉसम पब्लिक : ३ बाद ८५ (कौस्तुभ जांभळे नाबाद २५, संस्कार टोगे २१, अक्षज कालंदे १-७).
विबग्योर : ५१ : आकाश मेहता ७, प्रणय ढवळे ३-४, आर्यन मुरमुरे २-१३) पराभूत वि. एमआयटी : १ बाद ५२ (स्वयम पाटील १३).
विष्णूची तडाखेबंद फलंदाजी
रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात भूगाव येथील श्री श्री रविशंकर विद्या मंदिरचा युवा क्रिकेटपटू व कर्णधार विष्णू मूल्या याने अवघ्या ४२ चेंडूंत नाबाद ८२ धावांचा पाऊस पाडत संघाला ५९ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्री श्री रविशंकर विद्या मंदिरने १० षटकांत बिनबाद १२० धावा काढल्या. यात सलामीवीर विष्णूच्या नाबाद ८२ व शुभम पानसेच्या नाबाद २५ धावांचा समावेश होता. प्रत्युत्तरात सेनापती बापट रस्त्यावरील अक्षरनंदन स्कूलचा संघ ४ बाद ६१ धावांपर्यंतच मजल मारू शकला. विष्णूने गोलंदाजीतही एक विकेट घेत सामनावीर पुरस्कार पटकावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.