पुणे

साहित्य, संस्कृती, समाजाचा अनुबंध

CD

संस्कृतीतून साहित्याचा जन्म होत असतो. साहित्य हे मानवी जीवनाचे प्रतिबिंब असल्याने ते समाजाचा आरसा ठरते. समाजातील राजकीय, आर्थिक, सामाजिक संस्थाही त्या संस्कृतीचा पर्यायाने साहित्याचा अविभाज्य भाग असतात. साहित्य, कला, रूढी, परंपरा, समजुती, धारणा, श्रद्धा, कौशल्ये, क्षमता, गरजा, तत्त्वज्ञान, नैतिकता, संकल्पना, जीवनपद्धती अशा अनेक गोष्टींना आपल्या प्रवाहात सामावून घेत साहित्य सामाजिक स्तर सुपीक करीत असते. या अनुषंगाने साहित्य, संस्कृती आणि समाज या तीनही गोष्टींचा अनुबंध हा मला महत्त्वाचा वाटतो.
- डॉ. संभाजी मलघे, प्राचार्य, इंद्रायणी महाविद्यालय
--------------------------
ज्यावेळेस विविध संस्कार परंपरेने अनेक पिढ्यांमध्ये हस्तांतरित होत असतात. त्यावेळेस तो आपला सांस्कृतिक वारसा ठरतो. अनेक रूढी, परंपरा, रितीरिवाज यातून हा वारसा माणसाचे जगणे समृद्ध करीत असतो. समग्र मानवी जीवन जगण्याच्या नीतिमान आणि उन्नत अवस्थेसाठी संस्कृती कारणीभूत ठरत असते. विविध लोकसमुदायांच्या एकत्रित सांधण्यातून संस्कृतीचे आविष्करण होत असते. यात संस्कृतीतून साहित्याचा जन्म होत असतो.
तळेगाव दाभाडे पर्यायाने मावळ तालुक्याचा साहित्यिक अंगाने विचार करायचा झाल्यास वरील सांस्कृतिक विवेचनाचे अनेक पदर उलगडता येतात. मावळची भूमी ही मुळातच राकट, कणखर. इथले अभेद्य किल्ले छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देत आजही दिमाखात उभे आहेत. निसर्ग सौंदर्याचे लेणे ल्यालेल्या इथल्या दऱ्याखोऱ्या आणि नदीनाल्यांचे खळखळणारे अवखळ प्रवाह मावळ तालुक्याचे प्राकृतिक सौंदर्य आणखीनच खुलवतात. संतांच्या शिकवणुकीने वैचारिक समृद्धता ही या भूमीची ठाशीव ओळख. सरदार दाभाडे यांच्या पराक्रमाच्या कथा तत्कालीन संपूर्ण महाराष्ट्र देशात पसरलेल्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची काही पाने देखील याच तळेगाव दाभाडेमध्ये लिहिली. सरदार दाभाडे यांच्या नावाने प्रसिद्ध पावलेली ऐतिहासिक तळेगाव नगरी ही स्थलांतरितांना आश्रय देणारी भूमी म्हणून ओळखली जाते. या ना अशा कितीतरी वैशिष्ट्यांनी ही भूमी समृद्ध आहे.

प्रेरणादायी समर्थ शाळा
तळेगाव दाभाडे व मावळ तालुक्यात राष्ट्रीय शिक्षणाची बीजे सर्वप्रथम भारतीय स्वातंत्रलढ्यातील अग्रणी नेते लोकमान्य टिळक व विष्णू गोविंद तथा अण्णासाहेब विजापूरकर यांनी रोवली. ही गोष्टच मुळी त्या काळात खूप क्रांतिकारक ठरणारी होती. एखादा गाव समृद्ध होतो म्हणजे नेमके काय घडते? तर तेथील शैक्षणिक प्रवाहाने समाजाला प्रगल्भ दृष्टी दिलेली असते. विचारांचे कोंदण प्राप्त झालेला समाज हा नेतृत्वक्षम बनतो आणि विचारांची पेरणी करण्यास सक्षम ठरतो. तळेगाव दाभाडे व पर्यायाने मावळ तालुक्याचे असेच आहे. राष्ट्रीय शिक्षणाचा प्रवाह ज्या समर्थ शाळेतून तयार झाला. त्या शाळेने अनेक नामांकित लोकांना विद्यार्थी म्हणून सर्वप्रथम घडविले. थोर क्रांतिकारक भगतसिंग यांना देखील क्रांतिकार्याची प्रेरणा ज्यांच्याकडून मिळाली ते विष्णू गणेश पिंगळे हे समर्थ शाळेचे माजी विद्यार्थी. साधारण पाच हजारांच्यावर मंगलाष्टक लिहिणारे, अनेक कादंबऱ्या व लघुकथा लेखन करणारे तसेच मीनाक्षी दादरकर हे टोपण नाव धारण करीत ज्यांनी आपली साहित्यिक वाटचाल केली, असे लोककवी मनमोहन उर्फ गोपाळ नरहर नातू हेही या समर्थ शाळेचेच विद्यार्थी. सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट हे देखील समर्थ शाळेचेच विद्यार्थी. आता ज्या शाळेने इतकी मोठी लोक समाजाला दिली असतील, त्या शाळेचा पर्यायाने त्या भूमीचा वारसा किती उन्नत आणि समृद्ध असू शकेल, याचा आपणास अंदाज येतो. या अर्थाने तळेगाव नगरीचे साहित्यिक मूल्य अनेक अर्थाने सकस आहे.

साहित्यिकदृष्ट्या समृद्ध
तळेगाव दाभाडे हे नाव साहित्यिकदृष्ट्या अधिक समृद्ध केले ते दुर्गमहर्षी गो.नी.दांडेकर, संशोधन महर्षी रामचंद्र चिंतामण ढेरे, रियासतकार गो. स. सरदेसाई, अण्णासाहेब विजापूरकर, वि.का. राजवाडे यांनी. काही मान्यवरांची ही जन्मभूमी होती; तर काहींची कर्मभूमी. परंतु त्यांच्या सहवासाने मात्र या भूमीला साहित्याच्या क्षेत्रात पुढे जात नेतृत्व करता आले हे महत्त्वाचे.
गो.नी. दांडेकर यांनी कुमारसाहित्य, ललित लेखन, गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक लेखन असा बहुआयामी लेखन प्रपंच असलेले गोनिदा म्हणजे तळेगावची शान
म्हणावे लागतील. परतवाडा ही त्यांची जन्मभूमी जरी असली तरी तळेगाव दाभाडे ही त्यांची कर्मभूमी ठरली. त्यांच्या एकूण जगण्याच्या विविध गोष्टींना पैलू याच नगरीत पडले. लेखक म्हणून साहित्याची आणि कार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा त्यांनी या तळेगाव दाभाडेमध्ये केली.
रा.चिं.ढेरे यांचा जन्मच मुळी मावळातील निगडे या गावातला. प्राच्यविद्या संशोधन आणि लोकसाहित्य संशोधन यात ढेरे यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्र संस्कृतीच्या अनेक अस्पर्शी पैलूंवर प्रकाश टाकण्याचे बहुमूल्य काम त्यांनी केले. दैवतशास्त्र, लोकसंस्कृती, सांस्कृतिक इतिहास या विषयांत त्यांचा विशेष अभ्यास असून त्यांनी या विषयांवर विपुल लेखन केले आहे. संस्कृती, साहित्य, लोकविद्या या क्षेत्रातील त्यांची मुशाफिरी ही शब्दातीत आहे.
इतिहास मार्तंड म्हणून ज्यांचा उल्लेख करता येतो, असे रियासतकार गो.स. सरदेसाई यांनी मराठी रियासत, मुसलमानी रियासत आणि ब्रिटिश रियासत यांसारख्या अनेक ग्रंथांचे लेखन केले. त्यांना केंद्र सरकारने ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले होते. याच मांदियाळीतील पुढील नाव म्हणजे लेखिका वसुधा माने होय. लघुकथा, ललितलेख, प्रवासवर्णने अशी विस्तृत साहित्य संपदा लाभलेल्या वसुधा माने यांची साहित्यिक कारकीर्द तळेगावातच बहरली.

शैक्षणिक वारसा
तळेगाव दाभाडे आज शैक्षणिक क्षेत्रात विद्याचे दुसरे माहेरघर बनण्याच्या दिशेने पुढे जात आहे. या शैक्षणिक प्रवासातील मैलाचा दगड ठरलेल्या इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेची उभारणी करणारे म.मा. आळतेकर आणि आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचेही वास्तव्य या तळेगाव नगरीला लाभले आहे. आळतेकर हे मराठी भाषेतील एक नामवंत साहित्यिक व इंद्रायणी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होय. विनोदवीर आचार्य अत्रे म्हणजे उभ्या महाराष्ट्राला परिचित असलेलं साहित्य, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक समृद्ध व्यक्तिमत्व होय. या दोन्हीही द्रष्ट्या व्यक्तिमत्त्वांनी सुरू केलेल्या इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचा आज झपाट्याने विस्तार होत असून शैक्षणिक नेतृत्व करण्याची सक्षमता संस्थेने प्राप्त केलेली आहे. तिचा भारवाही म्हणून प्राचार्य म्हणून काम बघताना व साहित्याची सेवा करताना मलाही एक मनस्वी आनंद मिळतो आहे. ज्या संस्थेचे नेतृत्व आज आळतेकर, अत्रे असं नामवंत व्यक्तिमत्त्वांनी केले आहे. त्यांचा तोच शैक्षणिक आणि साहित्यिक वारसा पुढे नेताना मला कायम आत्मिक सुखाचा आनंद मिळतो. कविता, व्यक्तिचित्रण, समीक्षा, ललित लेखन असा माझ्याही साहित्याचा आयाम मला विस्तृत करता आला. याचे सर्वश्रेय याच भक्कम वारसाचे आहे. प्रभाकर ओव्हाळ यांच्यासारखा लोकसाहित्यिकही याच भूमीने दिला. आंबेडकरी चळवळ, लोकसाहित्य, समीक्षा अशा विविध माध्यमातून ओव्हाळ यांनी साहित्याची सेवा केली आहे. इंद्रायणी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि राम गणेश गडकरी यांच्यावर विशेष अभ्यास असलेले अमेय गुप्ते यांची साहित्य संपदा याच तळेगाव नगरीत बहरलेली आहे.

मराठी साहित्याचे जागरण
गो.नि. दांडेकर यांनी स्थापन केलेली मराठी साहित्य व संस्कृती मंडळ ही संस्था देखील आज तळेगावात साहित्य क्षेत्राचे नेतृत्व करताना दिसते आहे. तसेच मराठी साहित्य उत्कर्ष मंडळ, चंद्रकिरण मंडळ यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून मराठी साहित्याचे जागरण तळेगाव नगरीत सातत्याने होत असते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मावळ शाखेच्या माध्यमातूनही विविध साहित्यिक उपक्रम तळेगाव नगरीत होत असतात. कलापिनीच्या माध्यमातूनही विविध सांस्कृतिक आणि साहित्यिक उपक्रमांची रेलचेल तळेगावकरांसाठी खुली असते. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे पहिले संस्थापक चिटणीस विष्णू गोविंद तथा अण्णासाहेब विजापूरकर यांचाही साहित्यिक व्यासंग दांडगा होता. तत्कालीन अनेक पंडितांशी त्यांचे साहित्यिक संबंध दृढ होते. त्यामुळेच इतिहासाचार्य वि.का. राजवाडे, महामहोपाध्याय सिद्धेश्वरशास्त्री चित्राव अशा नामवंत मंडळींचे उठणे बसणे तळेगाव दाभाडेमध्ये होते. अशा समृद्ध ऐतिहासिक अनुषंगाने सांस्कृतिक आणि साहित्यिक वारशाला जपत तळेगाव नगरी पर्यायाने मावळ तालुका आज साहित्य, शिक्षण, उद्योग व्यवसाय अशा अनेक क्षेत्रांमध्ये जगाच्या नकाशावर झळकत आहे. हा वारसा साहित्यिक म्हणून पुढे नेताना व प्राचार्य म्हणून काम करत असताना मला नेहमीच अभिमान वाटतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chrome Users Warning : 'क्रोम युजर्स'साठी सरकारी एजन्सीने जारी केला गंभीर इशारा!

Eknath Shinde: राजस्थानमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला इशारा, निवडणुकीवरुन दिला 'हा' अल्टिमेटम

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Marathwada Crime : कडेठाण येथे मुलाने केला पित्याचा खून; प्रेत पुरले घरात; आठ दिवसानंतर घटना उघडकीस!

Theur Crime : पिऊन रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला उचलुन बाजुला करण्याकरीता गेलेल्या दोघांना तिघांनी केली मारहाण!

SCROLL FOR NEXT