पुणे, ता. २५ ः पराभवाच्या छायेमधून बाहेर पडत ‘एनपीएव्ही’ संघाने सकाळ प्रीमियर क्रिकेट लीगच्या अंतिम सामन्यात परुळेकर कन्स्ट्रशन संघाला ४ गडी राखून हरवत पहिल्या पर्वाचे विजेतेपद पटकाविले. विजयाचा शिल्पकार आणि अष्टपैलू खेळाडू रणजित फराटे याने तळाच्या फलंदाजांबरोबर नाट्यमयरीत्या संघर्ष करत विजेतेपद खेचून आणले.
सकाळ माध्यम समूहातर्फे हांडेवाडी येथील सनी ११ स्पोर्ट्स क्लब येथे ही स्पर्धा भरविण्यात आली. ‘रावेतकर ग्रुप’ हे स्पर्धेचे प्रायोजक, तर ‘पीएनजी ब्रदर्स’ हे सहप्रायोजक राहिले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सकाळ माध्यम समूहाचे संचालक राहुल पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सकाळ माध्यम समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, पुणे युनिट हेड सिद्धार्थ माळवदकर, पीएनजी ब्रदर्सचे नीलेश कांबळे, दीपक सोनावणे, चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक पियुष जगताप आदी उपस्थित होते.
स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा आणि अंतिम सामाना हा आठ षटकांचा झाला. उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात ‘एनपीएव्ही’ संघाने ‘नगरकर ज्वेलर्स’ संघाचा सात गडी राखून पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. १५ चेंडूत केलेल्या ४० धावांच्या तुफानी फलंदाजीसाठी एनपीएव्हीचा कुणाल खोंड हा सामन्याचा मानकरी ठरला. तसेच उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात ‘परुळेकर कन्स्ट्रक्शन संघाने भगत लिजेंड्स संघाला आठ गडी राखून मत दिली आणि अंतिम सामन्यात धडक मारली. परुळेकर कन्स्ट्रक्शनचा रत्नदीप चौधरी हा सामन्याचा मानकरी ठरला.
रोमहर्षक अंतिम सामना
अंतिम सामन्यात एनपीएव्ही संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथमेश गोसावी आणि जाहीद पठाण यांनी सुरेख सुरवात करत पॉवरप्लेच्या तीन षटकांत दोघांनी केवळ १२ धावा दिल्या आणि तीन गडी बाद केले. परुळेकरच्या सौरभ दळवी, फरहान दरवेश आणि विश्वजित गरुड या पहिल्या फळीने केवळ १२ धावा केल्याने परुळेकरच्या मधल्या फळीवर दबाव वाढला. एनपीएव्हीच्या आकाश तावरे, आसिफ शेख आणि रणजित फराटे यांनी परुळेकरच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला आणि त्यांना आठ षटकांच्या अखेरीस ४६ धावांवर रोखले. धावांचा पाठलाग करताना पहिल्याच षटकांत एनपीएव्ही संघाला धक्का बसले. परुळेकरच्या विवेक बुधावले याने एनपीएव्हीच्या अशोक गायकवाड आणि पप्पू तोडकरला धावा न करताच तंबूत परत पाठविले. उपांत्य फरीच्या सामन्याचा मानकरी रत्नदीप चौधरीने देखील दुसऱ्या षटकांत दोन गडी बाद केले. तिसऱ्या षटकांत विवेकने एनपीएव्हीचा महत्त्वाचा खेळाडू बबलू पाटील याला पहिल्याच चेंडूत (गोल्डन डक) बाद केले. त्यामुळे अवघ्या १८ धावा फलकावर असतानाच एनपीएव्ही संघाचे पाच फलंदाज तंबूत परतले होते. परंतु रणजित फराटे याने एक बाजू रोखून धरली.
अन् सामना फिरला...
रत्नदीप चौधरीच्या षटकात रणजित फराटेने एक षटकार आणि दोन चौकारांच्या साथीने १४ धावा केल्या आणि एनपीएव्ही संघ पुन्हा विजेतेपदाच्या शर्यतीत परतला. शेवटच्या तीन षटकांत आठ धावांची गरज होती. एनपीएव्हीकडे चार विकेट होत्या. सहाव्या षटकात रणजितने प्रदीप नयनीतच्या वेगवान चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारत चौकार काढला आणि विजयासाठी केवळ दोन धावा ठेवल्या. १२ चेंडूंत दोन धावा उरल्या असताना पीयूष जगताप याने चौकार मारत एनपीएव्ही संघाला सकाळ प्रीमियर क्रिकेट लीगच्या विजेतेपदावर पोचवले.
रणजितची अष्टपैलू खेळी
अंतिम सामन्यात एक विकेट आणि १७ चेंडूत केलेल्या नाबाद २७ धावांच्या निर्णायक खेळीसाठी एनपीएव्हीचा रणजित फराटे याला सामनावीराच्या किताबाने गौरविण्यात आले. एका बाजूने विकेट पडत असताना रणजितने एक बाजू रोखून धरली आणि खालच्या फळीच्या फलंदाजांबरोबर संयमी खेळी केली.
स्पर्धेसाठी पंच हर्षद पाटील, पवन राठोड, आबा चौधरी तसेच स्कोअरर करण जोशी, समालोचक सूरज धायगुडे, अनिकेत गुंजाळ, ग्राउंडमन बंटी हरिमोहन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
संक्षिप्त धावफलक
अंतिम सामना - परुळेकर कन्स्ट्रक्शन : ८ षटकांत ५ बाद ४६ (चैतन्य पाटील १७, नयन भगत १०, प्रथमेश गोसावी २८, जाहीद पठाण २-१०, रणजित फराटे १-१३) पराभूत विरुद्ध एनपीएव्ही : ६.४ षटकांत ६ बाद ५० (रणजित फराटे नाबाद २७, कुणाल खोंड १०, विवेक बुधावले ३-९, रत्नदीप चौधरी २-२५, नयन भगत १-५) सामन्याचा मानकरी : रणजित फराटे.
पहिला उपांत्य सामना - नगरकर ज्वेलर्स : ८ षटकांत २ बाद ६७ (आशुतोष केदार नाबाद ४३, गणेश हडवले नाबाद ११, जाहीद पठाण १-५, आसिफ शेख १-१२) पराभूत विरुद्ध एनपीएव्ही : ६ षटकांत ३ बाद ७२ (कुणाल कोंडे नाबाद ४०, बबलू पाटील नाबाद १७, सूरज आमले १-१०, शुभम शेळके १-१८) सामन्याचा मानकरी : कुणाल खोंड
दुसरा उपांत्य सामना - भगत लिजेंड्स : ६.२ षटकांत १० बाद ४२ (रोहित खरात १५, दत्त पवार १५, रत्नदीप चौधरी ४-१०, चैतन्य पाटील २-०, प्रदीप नयनीत २-७, सोनू बुधावले २-१०) पराभूत विरुद्ध परुळेकर कन्स्ट्रक्शन : ६ षटकांत ६ बाद ४७ (सौरभ पुसावळे नाबाद १९, चैतन्य पाटील १४, विकी कलमे ३-१७, समीर जगताप १-५, ओंकार गायकवाड १-५) सामन्याचा मानकरी : रत्नदीप चौधरी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.